चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी चंदगड तालुक्यातील मराठा बांधव ठामपणे एकवटला आहे. या पुढील काळात आरक्षण मिळेपर्यंत जरांग यांच्या पाठीशी हजारोंच्या संख्येने पाठबळ उभे करू. अशी ग्वाही चंदगड तालुक्यातील पाटणे-माणगाव फाटा येथे मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिली.
येथे झालेल्या धरणे आंदोलनात मराठा समाजातील शेकडे युवक, शेतकरी, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन मराठ्यांची वज्रमूठ दाखवून दिली. यावेळी समाजबांधवांनी हातात फलक, झेंडे व घोषणाबाजी करून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. सरकारने मराठा समाजाची होत असलेली उपेक्षा थांबवून तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.
आरक्षणाअभावी मराठा जातीच्या तरुण-तरुणींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ओबीसींना गेले शेकडो वर्षे जगणाऱ्या मराठा समाजावर यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. हे ओळखून मराठा समाजएकदिलाने लढण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला गेला. मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यानुसार आम्हाला आरक्षण हवे आहे. कुणाच्या वाटणीचं नको तर आमच्या वाट्याचे आरक्षण द्या. संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून आरक्षणाबाबत त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यासाठी आम्ही जरांगे यांच्या पाठीशी राहू आणि चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजामध्ये जनजागृती करून चंदगड तालुका एकजुटीने जरांगे यांच्या पाठीशी राहू, असा ठाम
विश्वास अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी गावागावांत मशाल मोर्चे काढणार, तालुक्यात विभागवार मेळावे घेणार, आरक्षण कसे मिळावे, यासाठी जनजागृती करणार असल्याचे प्रा. दीपक पाटील यांनी सांगितले, तर पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा, मराठा आरक्षणसाठी चंदगड तालुक्यातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाची राहण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही प्रशांत अनगुडे यांनी दिली. यावेळी नितीन पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, एम. जे. पाटील, दिलीप माने, पांडुरंग जाधव, पांडुरंग बेनके, जानबा चौगले, प्रभाकर खांडेकर, शंकर मनवाडकर, विष्णू गावडे, नवनीत पाटील, रजत हुलजी, महादेव बाणेकर, भरमू नांगनूरकर, एकनाथ कांबळे, वसंत जोशीलकर आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विलास पाटील, तानाजी गडकरी, बसवंत अडकूरकर, संजीवनी ओऊळकर, प्रताप डसके, उत्तम चदिकर, शांता जाधव, प्रताप ऊर्फ पिनू पाटील, अशोक ओऊळकर, कौशल बांदिवडेकर, विष्णू आडाव एम. के. पाटील, जयंत पाटील यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते.

No comments:
Post a Comment