कालकुंद्रीच्या कन्येचा स्केटिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर झेंडा - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2025

कालकुंद्रीच्या कन्येचा स्केटिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर झेंडा

प्रांजल प्रदीप पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

     कालकुंद्री (ता. चंदगड) गावची सुकन्या प्रांजल प्रदीप पाटील हिने नुकत्याच चेन्नई येथे पार पडलेल्या स्केटिंग स्पर्धेतील १४ वर्षे खालील मुलींच्या गटात कांस्यपदक पटकावले. तिची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालय (नवी दिल्ली) अंतर्गत '५४ व्या राष्ट्रीय खेलकुद प्रतियोगिता २०२५' मध्ये तिने हे घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धेत २१ प्रदेशांतील ५०० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. या कामगिरीबद्दल तिला केंद्रीय विद्यालय संघटन चे आयुक्त आर. सेन्दिल कुमार (चेन्नई विभाग), व संयुक्त आयुक्त (प्रशिक्षण) चंदना मंडल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

केंद्रीय विद्यालय नंबर २, कॅम्प बेळगाव शाळेत शिकत असलेली प्रांजल ही गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे स्केटिंग चा सराव करते. या कामी तीला प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र कलाद आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

 यापूर्वी तिने राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणीत १४ वर्षाखालील क्युट स्केटिंगच्या २००० मीटर स्पर्धेत कांस्य पदक तर राज्य स्तरावर एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अतुलनीय कामगिरी बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  कालकुंद्री सारख्या पूर्णपणे ग्रामीण भागातून आलेल्या व ग्रामीण भागातील मुलांसाठी पूर्णपणे वेगळा असलेल्या स्केटिंग सारख्या क्रीडा प्रकारात प्रांजलने दाखवलेले कौशल्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरणारे आहे. तिला आजोबा व एस. एस. हायस्कूल नेसरीचे सेवानिवृत्त शिक्षक शंकर आप्पाजी पाटील, आई-वडील व कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment