![]() |
जॉर्डन येथील पाहुण्यांसोबत मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
पर्यावरणातील लाखो सापांना जीवदान देणाऱ्या ढोलगरवाडी येथील सर्प शाळेला जॉर्डन व दुबई येथील कंपनी अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. आलेल्या परदेशी पाहुण्यांनी येथील सर्पमित्र, तज्ञ शिक्षक व विद्यार्थ्यांकडून विविध सापांबद्दलची माहिती व शाळेची कार्यप्रणाली जाणून घेतली.
६० वर्षांपूर्वी ढोलगरवाडी येथील शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक 'आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर' यांनी सन १९६६ पासून शेतकरी शिक्षण मंडळ संचलित मामासाहेब लाड विद्यालयाला संलग्न पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या सापांच्या संवर्धनासाठी हे सर्पालय सुरू केले. तो काळ म्हणजे 'दिसला असा की त्याला कर ठार' या मानसिकतेतील होता. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना माहिती देण्यासाठी टक्केकर यांनी काही विषारी व बिनविषारी साप शाळेच्या आवारात ठेवले. या गोष्टीला तत्कालीन विद्यार्थ्यांचे पालक व गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. शाळेवर मोर्चा काढला तथापि सर्पमित्र टक्केकर यांनी आपला वसा सोडला नाही. त्यांनी ग्रामस्थ व पालकांचे प्रबोधन करून विरोध थांबवला. नंतर याच शाळेतून शिकून बाहेर पडणारे हजारो विद्यार्थी सर्पमित्र म्हणून जगभर पसरले. त्यांच्या माध्यमातून आजतागायत मानवी वस्तीत शिरलेल्या लाखो विषारी व बिनविषारी सापांचे प्राण वाचले आहेत. बाबुराव टक्केकर यांच्या निधनानंतर त्यांचे अनुयायी व शाळेतील शिक्षकांनी हे कार्य पदरमोड करून सुरू ठेवले आहे.
तथापि तालुका, जिल्हा, राज्य व केंद्र प्रशासन तसेच शासन राज्य व केंद्र शासनाची या सर्प प्रबोधन व माहिती केंद्राची बाबतची अनास्था व १९७२ वन्यजीव अधिनियमाचा बडगा दाखवून हे केंद्र बंद करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वन्यजीव प्राणी संग्रहालय प्राधिकरण कडून सुरू असलेले प्रयत्न याबाबत पर्यावरण प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दुसरीकडे आर्मी, पोलीस, वन विभागातील जवान, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व इतर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर, सर्प अभ्यासक यांना अधिक माहितीसाठी शासन व प्रशासन ढोलगरवाडी ला पाठवते हा विरोधाभासच म्हणावा लागेल.
अशी परिस्थिती असताना जगभरातील अनेक देशातून सर्व अभ्यासक येथे भेट देऊन माहिती सापाबद्दलची माहिती घेऊन येथील सर्पोद्यानची तोंड भरून प्रशंसा करतात. नुकतेच जॉर्डन येथील अहमद अल- अस्सी व दुबई येथील राजन थॉमस यांनी येथे भेट दिली. त्यांच्यासोबत वीरेंद्र कदम बेळगाव उपस्थित होते या परदेशी पाहुण्यांना प्राचार्य एन. जी. येळ्ळूरकर, सहाय्यक शिक्षक व्ही. आर. पाटील व सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी सापांबद्दल माहिती दिली.
No comments:
Post a Comment