भाकड जनावरे झाली शेतकऱ्यांना डोईजड, गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची खाटीक समाजाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2025

भाकड जनावरे झाली शेतकऱ्यांना डोईजड, गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची खाटीक समाजाची मागणी

  

भाकड जनावरे झाली शेतकऱ्यांना डोईजड, गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची खाटीक समाजाची मागणी

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      गोवंश प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर करून तथाकथित गोरक्षकांकडून कुरेशी, खाटीक जमातीवर अन्याय होत आहे. हे थांबवण्यासाठी गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चंदगड  तालुक्यातील या समाजाने तहसीलदार चंदगड यांना आज ७ ऑगस्ट २०२५ रोजी दिले.

    वरील कायदा झाल्यापासून या कायद्याचा गैरवापर करून कायदेशीर वाहतूक करत असलेल्या जनावरांनाही अडवून जनावरे जप्त करणे, कुरेशी समाजावर खोट्या तक्रारी व गुन्हे दाखल केले जात आहेत. गाय व वासरू यांचे धार्मिक महत्त्व आम्हाला मान्य आहे. त्यांची कत्तल थांबवणे आम्ही योग्य मानतो गोहत्या कोठे होऊ नये यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, परंतु प्राणी संरक्षण अंतर्गत सरसकट बंदी घालू नये. 

   या कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे भाकड व निरुपयोगी जनावरे विक्रीवर बंदी घातल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून या भाकड जनावरांना विनाकारण पोसत राहिल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गोरक्षकांकडून पकडलेली जनावरे खाजगी गोरक्षक छावण्यात दिली जातात. ती जनावरे मागच्या दाराने पुन्हा बाजारात विकली जात असल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट झाले आहे.

   कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे  गरीब व श्रमिक समाजावर परिणाम, कृषी व आर्थिक व्यवस्थेवर परिणाम, भारत बीफ उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असून हे उत्पादन थांबल्याने देशाचे दरवर्षी 26 ते 27 हजार कोटींचे परकीय चलन बंद झाले आहे. याशिवाय चामड्याच्या वस्तू जसे बूट, सॅंडल, चप्पल, बॅग, सुटकेस, जॅकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बेल्ट शिंगा पासून बनणारे कंगवे, चाकूच्या दांड्या शोभेच्या वस्तू बनवणारे तसेच या अनुषंगाने निर्माण झालेले शेकडो उद्योग धोक्यात आले आहेत.

   या उद्योगात असलेल्या देशातील अल्पसंख्यांक व दलित समाजाच्या समस्या बाबत सुप्रीम कोर्टाने राज्यात नोडल अधिकारी नेमावे, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी. या सह निवेदनात कायदा हातात घेणाऱ्या तथाकथित गोरक्षकांवर कठोर कारवाई करावी. पोलिसांनी कुरेशी समाजाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू नयेत. गोहत्या बंदी कायद्यात सुधारणा करून भाकड जनावरे बैल, रेडा यांच्या कत्तलीस परवानगी द्यावी. गोरक्षण छावण्यामधील जनावरांची मोजदाद ठेवावी. शेतकरी व गरीब वर्गांच्या हितासाठी निरुपयोगी भाकड जनावरांची कायदेशीर खरेदी- विक्री व वाहतूक पूर्ववत करावी आदी मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. निवेदनावर बेपारी समाजाचे अध्यक्ष शब्बीर बेपारी पदाधिकारी ईनायतुल्ला बेपारी, समीउल्ला बेपारी, यासीन मौला बेपारी, आदींच्या सह्या आहेत.

    मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देताना बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, आनंद गावडे, सुभाष भोसले, विष्णू पाटील, मायाप्पा पाटील, संभाजी मोहिते, यल्लाप्पा पाटील, फिरोज मुल्ला, शब्बीर बेपारी आदींसह कुरेशी बेपारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करावी व शेतकरी तसेच कुरेशी समाजावर होणारा अन्याय थांबवावा  या मागणीचे निवेदन तहसीलदार चंदगड यांना देताना कुरेशी समाज व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.

No comments:

Post a Comment