महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर यांचा वाढदिवसानिमित्त कालकुंद्री ग्रामस्थांकडून सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2025

महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर यांचा वाढदिवसानिमित्त कालकुंद्री ग्रामस्थांकडून सत्कार

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्याचे कुस्ती क्षेत्रातील मानबिंदू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर (तात्या) यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कालकुंद्री ग्रामस्थांच्या वतीने पुस्तके व शाल देऊन कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.

       वाढदिवसानिमित्त पैलवान जोशीलकर यांचा खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत 'ग्रंथ तुला' करून अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी जोशीलकर यांच्या घरी भेट देऊन कालकुंद्री येथील दैनिक पुढारी चे पत्रकार व चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह माजी सैनिक शरद जोशी, पांडुरंग गोंधळी, शुभम पाटील आदी  ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल व ग्रंथ तुला करण्यासाठी वाचनीय पुस्तके भेट देऊन अभिष्टचिंतन केले.   

       चंदगड तालुक्यातील किणी गावचे सुपुत्र असलेल्या विष्णू जोशीलकर यांनी कुस्तीतील क्षेत्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना क्रीडा क्षेत्रातील मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले.  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चे अधिकारी, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी व छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप टाकली. तालीम चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या नेहमी स्मरणात राहील. विज कामगार संघटनेचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे.  त्यांच्या कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून शेकडो कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या ग्रंथ तुला कार्यक्रमासाठी जमा झालेली हजारो पुस्तके जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वितरित केली जाणार आहेत. त्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील रामपूर गावचे निवृत्त सहाय्यक निबंध अरुण काकडे व चंदगड तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे नेते वसंत जोशीलकर यांनी मनोगते व्यक्त केली.

No comments:

Post a Comment