आजरा : सी एल वृत्तसेवा
मुंबईतील गिरण्यांची जागा शिल्लक असताना दलालांमार्फत किंमत नसलेली घरे गिरणी कामागारांच्या माथी मारली जात आहेत. हे उद्योग बंद करावे अन्यथा संघटितपणे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कॉ. अतुल दिघे यांनी दिला. ते आजरा येथे किसान भवनात झालेल्या गिरणी कामागारांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले.
मुंबई येथील गिरणीच्या जागेतील ६०० एकर जागेपैकी २०० एकर जागा गिरणी कामागारांना देण्याचा निर्णय झाला होता. परंतु शासनाने गिरणी मालकांना जादा जागा देऊन केवळ २६ एकर जागेत गिरणी कामगारांना घरे बांधून देण्याचा निर्णय झाला. अडीच लाख गिरणी कामगारांनी घर मागणीसाठी अर्ज केले असताना त्यापैकी केवळ १४ हजार घरे गिरणी कामगारांना मिळाली आहेत. उर्वरित कामगारांना झुलवत ठेवण्यात आले आहे.
यावेळी कॉ. शांताराम पाटील सर्व गिरणी कामगारांनी आपले प्रश्न सुटेपर्यंत सातत्याने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी महादेव होडगे, कॉ. घोडिंबा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नारायण राणे, निवृत्ती मिसाळे, तानाजी पाटील, हिंदूराव कांबळे, बाबू केसरकर, महादेव पोवार, अनिता बागवे, सोनाली तेजम, सजाबाई देसाई, केरुबाई शिंदे, सुगंधा पन्हाळकर, काशिनाथ मोरे यांच्यासह गिरणी कामगार व वारसदार उपस्थित होते. कॉ. संजय घाटगे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment