संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त काढलेल्या पहिल्या ठेव पावती चे वितरण श्रीकांत पाटील यांना करताना चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्य
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
आपल्या स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या कोवाड, ता. चंदगड येथील दि. कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता कोवाड येथील संस्था इमारत सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन दयानंद मोटूरे होते.
प्रास्ताविक व्हाईस चेअरमन उत्तम मुळीक यांनी केले. यावेळी जेष्ठ संचालकांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. अहवाल वाचन मॅनेजर पी. पी. पाटील यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. २५ वर्षाची देदीप्यमान वाटचाल असलेल्या संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून तालुक्याच्या मध्य व पश्चिम भागात नव्या शाखा काढण्यास सभासदांनी मान्यता दिली. यावरून संस्थेची पहिली शाखा पाटणे फाटा परिसरात काढण्याचे जाहीर करण्यात आले. संस्थेचा रौप्य महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी पहिली पावती चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार श्रीकांत पाटील यांना देऊन शुभारंभ करण्यात आला. ५ हजार रुपये च्या पटीत ८४ महिन्यात दाम दुप्पट होणाऱ्या या योजनेत दोन दिवसातच २०० ठेव पावत्यांची नोंदणी झाल्याचे सांगून चेअरमन मोटुरे यांनी सर्वसामान्य नागरिकांचा संस्थेवरील विश्वास किती दृढ आहे. हे स्पष्ट झाल्याचे सांगितले.
यावेळी दहावी बारावी परीक्षेत क्रमांक पटकावलेल्या सभासदांच्या मुलामुलींचा गौरव करण्यात आला. यात गुणानुक्रमे आलेले इयत्ता १० वी मधील कु. मिताली विजय पाटील (कालकुंद्री), श्रीनाथ सदानंद पाटील (राजगोळी बुद्रुक), कु. रामेश्वरी परशराम कडलगेकर (कोवाड) यांचा तर इयत्ता १२ वी कु. गायत्री गोविंद मेणसे (तेऊरवाडी), सार्थक जोतिबा पाटील व कु. समीक्षा जोतिबा पाटील हे जुळे भाऊ-बहीण (कालकुंद्री) यांचा गौरव करण्यात आला.
आयत्यावेळी येणाऱ्या विषयात वार्षिक सभेची उपस्थिती वाढवण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सभासदांना दोनशे रुपये मानधन द्यावे. अशी सूचना श्रीधर भोगण यांनी मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत माजी मुख्याध्यापक रवींद्र देसाई (कागणी), याकूब मुल्ला, श्रीधर भोगण, आप्पा वांद्रे, बाळू ठाणू, शिवाजी तेली (कोवाड) संजय कुट्रे (किणी) आदी सभासदांनी भाग घेतला.
यावेळी चेअरमन दयानंद मोटुरे यांनी संस्थेच्या ३ सप्टेंबर रोजी आयोजित रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सभासद व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment