कुदनूर ग्रामपंचायतच्या वतीने 'हर घर तिरंगा' अभियान प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2025

कुदनूर ग्रामपंचायतच्या वतीने 'हर घर तिरंगा' अभियान प्रारंभ

 

कुदनूर येथे हर घर तिरंगा अभियान प्रारंभ प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वजारोहण करताना जमादार दांपत्य

कुदनूर : सी एल वृत्तसेवा

   चंदगड तालुक्यातील सर्वात मोठ्या कुदनूर ग्रामपंचायतच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' अभियानचा प्रारंभ करण्यात आला. स्वागत सरपंच प्रा सौ. संगीता सुरेश घाटगे यांनी केले.

जमादार दांपत्याचे स्वागत करताना सरपंच सौ. घाटगे

  यानिमित्य दि. १३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान गावातील दस्तगीर हुसेन जमादार व सौ बेबीजान जमादार या दांपत्याला देण्यात आला. गावात वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती अशा सन १९६० ते ९० या काळात गावातील आडलेल्या बाळंतीणींचे सुखरूप व मोफत बाळंतपण करणाऱ्या सुईनबाई दिवंगत मासाबी हुसेन जमादार यांच्या समाजकार्याची आठवण म्हणून त्यांचा मुलगा व सून यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या आगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.  यावेळी शासकीय स्तरावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

 सरपंच  सौ. प्रा. संगीता सुरेश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित निवृत्त मुख्याध्यापक भागाणा नागरदळे, दशरथ आंबेवाडकर, राजाराम बांबरगेकर यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अशोक हनुमंत वडर व सर्व सदस्य, सिद्धेश्वर हायस्कूल चे शिक्षक व विद्यार्थी तसेच गावातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत सोनार यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment