तेऊरवाडी : एस के पाटील / सी. एल. वृत्तसेवा
मन, मनगट आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर तेऊरवाडी (ता. चंदगड ) येथील मराठी माध्यमांच्या शाळांत शिकलेल्या शामराव दत्तू पाटील या युवकांने देशात दबदबा निर्माण केला आहे. सर्वसामान्य कुटंबामध्ये जन्मलेल्या शामराव पाटील यांची आई अशिक्षित व वडील अल्पशिक्षित असूनही UPSC मधून क्लास वन अधिकारी म्हणजे भारत सरकार कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार अत्यंत सक्षमतेने ते सांभाळत आहेत. शामराव पाटील यांचा तेऊरवाडी ते दिल्लीपर्यंतचा हा प्रवास सर्वानाच थक्क करणारा आहे.
तेऊरवाडी सारख्या कोरडवाहू गावात शामराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावतीलच मराठी विद्यामंदिर मध्ये झाले. वडील दत्तू पाटील चंदगड येथील इंडाल कंपनीमध्ये कामाला असल्याने त्यांच्या सोबत इंडाल कॉलनीत रहायला आले. इंडाल ग्राऊंडवर खेळत चंदगड येथे ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून हलकर्णी महाविद्यालयात बी कॉम साठी प्रवेश घेतला. एमकॉम सायबर कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण करून गोवा येथे एका कंपनीमध्ये कामाला सुरवात केली . १९९५ पासून कंपनीत काम करत असताना सीएस चा अभ्यास करतच UPSC ची २००२ साली परीक्षा दिली. यामध्ये प्रचंड मोठे यश मिळाले.
या परीक्षेतून त्यांची मुंबई येथे रजिस्टार ऑफ कंपनीज म्हणून निवड झाली तेथून पुणे मग थेट नागपूर खंडपिठामध्ये मिनिष्ट्री ऑफ कॉर्पोरेट हेड अफेअर्स च्या डेप्यूटी रजिस्टार ऑफ कंपनिज येथे प्रमोशन झाले. या ठिकाणी आपल्या उत्कृष्ठ कामाचा ठसा उमटवला. तेथून थेट दिल्ली येथे भारत सरकारकडे बदली झाली. या ठिकाणी कार्पोरेट व्यवहार मंत्रालय भारत सरकार च्या सहसंचालक पदी प्रमोशन झाले. आपल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दिल्ली येथे उत्कृष्ठ कार्याबद्दल पुरस्कार, स्वच्छतेच्या कार्यासंबंधी पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच त्यांनी 500 वृक्षरोपन व संगोपन केले आहे. एक उच्चपदस्थ अधिकारी असूनही एक नावाजलेले खेळाडू आहेत. कॉलेजमध्ये असताना 100 मिटर 200 मिटर धावणे व लांब उडीमध्ये राज्यस्तरीय बक्षिसे पटकावली.
खेळाची आवड जोपासत भारत सरकारच्या देशातील विविध कंपन्यांची मंजूरी व कंपन्या संदर्भातीत धोरण ठरविण्याची जबाबदारी ते अत्यंत तन्मयतेने सांभाळत आहेत. तेऊरवाडी ते दिल्लीत भारत सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी असा त्यांचा हा प्रवास सर्वानाच प्रेरणादायी आहे. एक उच्चपदस्थ अधिकारी असूनही अत्यंत साधी राहणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असून सध्या चंगळवादाच्या मागे लागलेल्या पिढीला त्यांचा आदर्श अनुकरणीय असा आहे.
यशासाठी कठोर परिश्रमाची गरज - शामराव पाटील
यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी भाषेचा अडसर येत नाही. मातृभाषा मराठीतूनच शिकून मी यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थिती असली तरी ती कष्टाच्या जोरावर अनुकूल बनवून यशाची शिखरे गाठण्यासाठी युवकांनी सज्ज असायला हवे.
No comments:
Post a Comment