कोवाड माणगाव मार्गावर नाचना खरेदी केंद्र नजीक पडलेला हा भला मोठा खड्डा अपघातांना आमंत्रण देत आहे.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोवाड ते माणगाव मार्गावर माणगाव जवळ असलेल्या नाचणी खरेदी केंद्राजवळ गेल्या दोन वर्षापासून पडलेला खड्डा अपघातांना निमंत्रण देत आहे. हे ठिकाण दुचाकी, चार चाकी व मोठ्या वाहनांसाठी अपघाताचे केंद्रच बनले आहे.
चंदगड या तालुक्याच्या ठिकाणापासून पूर्वेकडील कोवाड परिसर व किणी कर्यात भागात येण्यासाठी बेळगाव वेंगुर्ले राज्य मार्गावरील माणगाव फाटा ते कोवाड, कामेवाडी, दड्डी तसेच तांबुळवाडी फाट्यापासून बागीलगे, रामपूर ते माणगाव मार्गे पूर्व भागात येण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा मार्ग पुढे कर्नाटकातील दड्डी व पुणे बेंगलोर राष्ट्रीय महा मार्गाला जोडणारा असल्याने यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मागील वर्षी हा रस्ता रुंदीकरण सह डांबरीकरण केल्याने वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे.
कोवाड - माणगाव रस्ता रुंद व नवीन असल्याने सर्वच वाहने भरधाव वेगाने ये जा करतात. सध्या पावसाळ्यात त या खड्ड्यात पाणी भरल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेली दोन वर्षे अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या खड्ड्यात धडकून अनेक वाहने नादुरुस्त व अपघातग्रस्त झालेली आहेत. याबरोबरच येथे असलेल्या जोड रस्त्यावरून पावसामुळे टेकडीवरील दगड माती वाहून रस्त्यावर येत असते. त्याचाही त्रास वाहनधारकांना बसत आहे. हा खड्डा मोठा अपघात घडण्यापूर्वी मुजवून दुरुस्त करावा तसेच वरून पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या पाणी व दगड मातीवर तात्काळ उपाययोजना करावी. अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment