![]() |
| वृषाली उत्तम पाटील |
नागनवाडी : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील पोरेवाडी या छोट्याशा गावातील वृषाली उत्तम पाटील हीची महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या निरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. एमपीएससी मधून अशा पदाला गवसणी घातलेली ती नागनवाडी अडकुर पंचक्रोशीतील पहिलीच मुलगी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल पोरेवाडी परिसर व चंदगड तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासून ती शांत, हुशार व आदर्श विद्यार्थिनी म्हणून शाळेत ओळखली जायची. वर्गात कोणत्याही परीक्षेत नेहमी तिचा प्रथम क्रमांक ठरलेला असायचा. मात्र या यशाने ती कधी हूरवळून गेली नाही. अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणे हा एकच ध्यास उराशी बाळगून तिचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते, त्याला अखेर यश मिळाले.
अडकुर भागातील मोठे एकत्र कुटुंब म्हणून पोरेवाडी येथील धोंडीबा निंगोजी पाटील व बंधू तसेच नातलग फगरे परिवाराला ओळखले जाते ४० ते ४५ सदस्य संख्या असलेले हे मोठे कुटुंब एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहे. शेतकरी कुटुंबातील काका, काकी व कुटुंबातील सदस्यांचे संस्कार व प्रोत्साहन मिळाल्यानेच ती या पदापर्यंत जाऊन पोहोचली. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वृषाली सामाजिक कार्यकर्ते दौलत चे संचालक, घटप्रभा शिक्षण प्रसारक मंडळ अमरोळी चे उपाध्यक्ष व प्रगतशील शेतकरी उत्तम पाटील यांची ती कन्या आहे. वृषालीने चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा तर सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला होता. एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवण्याचा तिने बहुमान मिळवला आहे.
पहिली ते चौथी गावातील जिल्हा परिषद शाळेत, पाचवी ते सातवी हलकर्णी हायस्कूल हलकर्णी, आठवी ते बारावी नवोदय विद्यालय कागल तर इंजिनिअरिंग आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. रामलिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक व प्राचार्य आर. डी. पाटील यांची ती पुतणी आहे. त्यांचे स्पर्धा परीक्षा संदर्भातील मार्गदर्शन वृषालीला उपयोगी पडले.

No comments:
Post a Comment