मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलकांना सुविधा पुरवणाऱ्यांचा कडगावात सन्मान व आनंदोत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2025

मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलकांना सुविधा पुरवणाऱ्यांचा कडगावात सन्मान व आनंदोत्सव

 


गारगोटी : सी एल वृत्तसेवा 

     मुंबईत २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर अखेर  मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांना निवासासाठी  नवी मुंबईमध्ये  सिडको एक्झिबिशन सेंटर व एपीएमसी मार्केट परिसरात  टास्क फोर्स तैनात करण्यात आला होता. आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांच्या निर्देशानुसार  अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या होत्या. या टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून  कडगाव, ता. भुदरगड चे सुपुत्र स्वप्निल संभाजीराव देसाई, (नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ ) उप अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका यांनी आठ दिवस नवी मुंबईत आलेल्या ५० ते ६० हज़ार लोकांना सर्व अत्यावश्यक सेवा पुरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. याबद्दल त्यांचा सन्मान व आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

     यावेळी  आरक्षण लढयातील अनुभव व पुढील वाटचाल यावर शहाजी देसाईसर यांनी सविस्तर माहिती  दिली.  इंजिनियर स्वप्निल देसाई यांनी नवी मुंबई येथील नियोजन विषयक माहिती दिली. संयोजक गणेश देसाई, मिलिंद देसाई, प्रकाश डेळेकर, रमेश रायजादे, बाजीराव देसाई अजित देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. 

   राजेंद्र देसाई, शशिकांत पाटील, दत्तात्रय देसाई, महादेव दबडे, श्रीकांत देसाई, के पी जाधव, रमेश जाधव, शेखर पोतदार,  रामराम देसाई, गजानन देसाई, सचिन जाधव, अक्षय देसाई, सदानन चव्हाण, सुनील देसाई, कोंडीबा सावर्डेकर, पप्पू डिसोजा, डॉक्टर शेणवी, आर एन म्हाडगूत, भालेकर महाराज, धोंडीराम पाटील,  केंजळेकर महाराज, संतोष काणेकर, मौलाना मुजावर आदी मराठा बहुजन बांधव उपस्थित होते.

    जय जिजाऊ- जय शिवराय, एक मराठा  लाख मराठा अशा घोषणांनी कडगाव भगवा चौक बस स्थानक परिसर दणाणून सोडला. यापुढेही आरक्षण लढा सामूहिकपणे नेटाने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वागत व प्रास्तविक मिलिंद देसाई यांनी केले. अजित देसाई  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment