![]() |
| सौ. पुनम महावीर भंडारी |
कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर येथील वरिष्ठ जलतरणपटू सौ. पुनम महावीर भंडारी यांनी ७४ व्या वर्षी जलतरण स्पर्धेच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र राज्य दिग्गज जलतरण असोसिएशनच्या वतीने २६ व्या 'राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण चॅम्पियनशिप २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सिद्धार्थ जलतरण तलाव छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडलेल्या स्पर्धेत पुनम भंडारी यांनी ७० ते ७४ वर्षे वयोगटातील ४०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत अभूतपूर्व कामगिरी केली. या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांना असोसिएशनचे पदाधिकारी शेखर भावसार, अरुण सावंत, मुकेश बादशाह, उल्हास पटेल, राजेश मेहता आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गेली अनेक वर्षे सौ. पुनम विविध जलतरण स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्यांनी आतापर्यंत समुद्रातील पोहण्याच्या स्पर्धेसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तब्बल ८० सुवर्णपदके याशिवाय रौप्य व ब्रांच पदके पटकावली आहेत. कोविड काळामध्ये त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तथापि या दुखण्यावर मात करून त्यानंतरही त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी उदयोन्मुख जलतरणपटूं समोर एक आदर्श ठेवला आहे. राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत जिल्ह्याला सुवर्णपदक मिळवून दिले. याबद्दल त्यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment