दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर कालकुंद्री- बेळगाव बस पुन्हा सुरू, अखंडित सेवा देण्याची प्रवाशांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2025

दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर कालकुंद्री- बेळगाव बस पुन्हा सुरू, अखंडित सेवा देण्याची प्रवाशांची मागणी

 

पंधरा दिवस बंद असलेली कालकुंद्री- बेळगाव बस ८ सप्टेंबर पासून पुन्हा सुरू झाली आहे.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

    चंदगड आगाराची कालकुंद्री- बेळगाव-कालकुंद्री बस सुमारे पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर आगार व्यवस्थापक यांनी पुन्हा सुरू केली आहे. यामुळे मार्गावरील प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.  कालकुंद्री ते बेळगाव दिवसातून चार फेऱ्या असलेली ही बस अखंडित व नियमित वेळेवर सोडावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. 

    सुमारे वीस वर्षांपूर्वी आगार व्यवस्थापक सुनील जाधव यांच्या काळात सुरू झालेल्या बसचा मार्ग ३-४ वर्षांपूर्वी पर्यंत आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग म्हणून ओळखला जायचा. तथापि अनियमित बस सेवा तसेच शासनाने महिला व ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे  उत्पन्न लक्षणीय रीत्या घटले आहे असे समजते. उत्पन्न घटण्यास चालक वाहक हे सुद्धा जबाबदार असल्याचे बोलले जात असून कालकुंद्री ते बेळगाव दरम्यान मार्गावरील २९ बस थांबे आहेत. ज्या ठिकाणी एकही प्रवासी उतरणारा नसतो तिथे चढणाऱ्या प्रवाशांचा विचार न करता किंवा निवारा शेड किंवा परिसरात प्रवासी आहेत का हे न पाहताच बस भरधाव पळवली जाते. असा प्रवाशांचा अनुभव आहे. बस बऱ्याच वेळा वेळेत नसते अशावेळी वृद्ध किंवा सर्वसामान्य प्रवासीही ऊन वारा पाऊस थंडी यापासून बचाव करण्यासाठी निवारा शेडमध्ये किंवा शेड नसल्यास आजूबाजूला आसरा घेऊन थांबलेले असतात. त्यांचा विचार चालक वाहक यांनी करून अशा थांब्यांवर पाहणी करूनच पुढे जावे अशी मागणी होत आहे. 

    कालकुंद्री, कुदनूर, तळगुळी, दिंडलकोप, कर्नाटकातील कुरिहाळ, बोडकेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, कंग्राळी खुर्द, मार्केट यार्ड, चन्नम्मा सर्कल मार्गे बेळगाव स्टॅन्ड धावणाऱ्या या बसचे वेळापत्रक- रोज दुपारी १२.३० वाजता चंदगड मधून सुटते, कडलगे मार्गे २.०० वाजता कालकुंद्री येथून ३.०० वाजता बेळगावला पोहोचते. ३.१५ वाजता बेळगाव मधून सुटून सायंकाळी ४.४५ वाजता कालकुंद्री येथे येऊन ५.०० वाजता कालकुंद्री ते बेळगाव. पुन्हा बेळगाव मधून ६.१५ ला सुटून कालकुंद्री येथे मुक्कामी ७.३० वाजता पोहोचते.

     दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता बेळगावला जाऊन सकाळी ८.०० वाजता बेळगाव मधून सुटून ९.०० वाजता कालकुंद्री येथे येते. पुन्हा ९.०० वाजता कालकुंद्री मधून बेळगावला जाऊन बेळगाव मधून १०.१५ वाजता कालकुंद्री साठी सुटते. दुपारी ११.१५ वाजता कालकुंद्री येथे येऊन कडलगे मार्गे चंदगडला जाते.

    उत्पन्नाच्या सबाबीखाली ही बस बंद होऊ नये व बस बंद झाल्यास गोरगरीब प्रवाशांची पुढील काळात गैरसोय होऊ नये यासाठी बसचा प्रवासी वर्गाने मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.  असे आवाहन मार्गावरील ग्रामपंचायतींनी केले आहे. याबरोबरच  अनेक ग्रामपंचायतीकडून ठरावाद्वारे ही बस खंडित किंवा अनियमित होणार नाही, तसेच वाहक चालक यांनी मार्गावर एकही प्रवासी चुकणार नाही  याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. अशी मागणी आगार व्यवस्थापक व संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्याचे समजते.

No comments:

Post a Comment