कुदनूरात डॉल्बी मुक्त गणेश विसर्जन, ग्रामपंचायत च्या प्रयत्नांना यश - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2025

कुदनूरात डॉल्बी मुक्त गणेश विसर्जन, ग्रामपंचायत च्या प्रयत्नांना यश

  


कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

   कुदनूर (ता. चंदगड) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती प्रतिष्ठापना केली होती. काल सर्व गणपतींचे शांततेच्या वातावरणात मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.

      गेल्या काही वर्षांत डॉल्बीचा दणदणाट व हुल्लडबाजी यामुळे चंदगड पोलिसांचे कुदनूर येथील गणेश विसर्जन मिरवणूकीकडे कटाक्षाने लक्ष असायचे. दरवर्षी गणेशोत्सव काळात येथे पोलीस पथसंचलन केले जायचे. तथापि यावर्षी ग्रामपंचायत च्या सरपंच प्रा. संगीता सुरेश घाटगे, उपसरपंच अशोक वडर व सदस्यांनी गणेशोत्सव मंडळांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच गणेशोत्सव मंडळांनी घातक डॉल्बी सिस्टीम ला फाटा दिला. 

      यंदा गावातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी टाळ मृदंग, भजन, ढोल- ताशा, बॅन्जो व पारंपरिक वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी गावातील मुख्य मार्ग गणेश भक्तांनी फुलून गेला होता. गणेशोत्सव मिरवणुकीत सांबरे, कडलगे, रामपूर येथील भजनी मंडळांचा सहभाग लक्षवेधी ठरला. गेल्या काही वर्षात महिलांनी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे झिम्मा फुगडी हे पारंपरिक खेळ व नृत्याचा आनंद घेतला. गेल्या काही वर्षात मिरवणुकी वेळी होणारे तणावपूर्ण वातावरण यंदा कुठेही दिसले नाही. याचे श्रेय पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाला द्यावे लागेल. तालुक्यातील सर्वच गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. 

       कुदनूर येथे यंदाच्या मिरवणुकीत नवक्रांती गणेश मंडळ, गजानन तरुण मंडळ, लक्ष्मी मंदिर मध्यवर्ती गणेश मंडळ, दक्षता गणेश मंडळ, शिव गणेश कला मंडळ, दुर्गामाता गणेशोत्सव मंडळ, आंबेडकर नगर आदी मंडळांनी सहभाग घेतला. याशिवाय अनेक घरगुती गणपतीचे विसर्जन ताम्रपर्णी नदीत करण्यात आले.

No comments:

Post a Comment