शेतकरी आणि कामगारांत फूट पाडण्याचा मानसिंग खोराटे यांचा कुटील डाव हाणून पाडा..! - विजय देवणे, खोराटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2025

शेतकरी आणि कामगारांत फूट पाडण्याचा मानसिंग खोराटे यांचा कुटील डाव हाणून पाडा..! - विजय देवणे, खोराटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव



 चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    "चंदगड तालुका व परिसरातील शेतकऱ्यांची दौलत असलेला दौलत कारखाना लिजवर चालवणारे मानसिंग खोराटे हे शेतकरी आणि कामगारांत फूट पाडण्याचे कुटील कारस्थान करत असून कामगारांवर खोटेनाटे आरोप करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडा. अन्यायग्रस्त शेतकरी कामगारांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कार्यक्षेत्रातील नागरिक, ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांनी भक्कम लढा उभा करावा. जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल." अशी निःसंदिग्ध ग्वाही शिवसेना जिल्हा सह-संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिली. ते कारखाना स्थळावर नुकत्याच झालेल्या शेतकरी, कामगार, ऊस तोडणी आणि वाहतूकदार कामगारांच्या सभेत बोलत होते.

     मानसिंग खोराटे यांनी प्रसृत केलेल्या चित्रफितीत जिल्हाधिकारी यांच्याबद्दल उपमर्द करणारी भाषा वापरली आहे. त्पोयाबद्दल पोलिसांनी खोराटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. 'दौलत' सहकारी साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी दौलत साखर कामगारांच्या घरातील महिला पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांना २४ ऑक्टोबरला भेटून साकडे घालतील. अशी घोषणा कॉम्रेड उदय नारकर यांनी केली. 

     दौलत लीजवर चालवणाऱ्या मानसिंग खोराटे यांना कायदा कानून पाळण्याचे काहीच पडलेले नाही. असे त्यांच्या वागण्यातून दिसते. दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत आहे. याला आळा घालण्यासाठी कामगार व शेतकऱ्यांच्या व्यथा पालक मंत्र्यांच्या कानावर घालण्याचा यामागे उद्देश आहे. असे नारकर यांनी सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे खजिनदार प्रा. आबा चौगले होते.

२८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत दौलत प्रशासनाने समाधानकारक तोडगा न काढल्यास लढ्याचे पुढील पाऊल उचलावे लागेल. त्याच्या होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी अथर्व प्रशासनावर राहील. असा इशारा चंदगड तालुका साखर कामगार संघटनेचे सचिव प्रदीप पवार यांनी दिला. याबाबत मांडलेला ठराव प्रचंड घोषणांच्या प्रतिसादात सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.

  या सभेत कामगार नेते कॉ. अतुल दिघे, सुभाष देसाई, शेखर गावडे, नंदकुमार गावडे. श्रीधर शिंदे, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे, तानाजी गडकरी, दशरथ दळवी, रवी नाईक आदींनी शेतकरी कामगारांच्या लढ्याला पाठिंबा देणारी भाषणे केली. सूत्रसंचालन अशोक गावडे यांनी केले. यावेळी शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार महादेव फाटक यांनी मानले.

हलकर्णी  येथील दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर कामगारांच्या सभेत बोलताना कॉम्रेड नारकर सोबत विजय देवणे आदी.

No comments:

Post a Comment