चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दौलत सहकारी साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी दौलत साखर कामगारांच्या घरातील महिला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाशराव अबिटकर यांना भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला भेटून साकडे घालतील, अशी घोषणा कॉ. उदय नारकर यांनी कारखाना स्थळावर झालेल्या भव्य सभेत केली. दौलतच्या शेतकरी, कामगार, ऊस तोडणी आणि वाहतूकदार कामगारांच्या सभेत ते बोलत होते. दौलत लीजवर चालवणारे मानसिंग खोराटे हे कोणतेच कायदे पाळत नाहीत. यासाठी कामगार शेतकऱ्यांच्या व्यथा पालक मंत्र्यांच्या कानावर घालण्याचा यामागे उद्देश आहे, असे ते म्हणाले. सभेच्या अध्यक्षस्थानी चंदगड तालुका साखर कामगार युनियनचे खजानीस प्रा. आबासाहेब चौगले होते.
“मानसिंग खोराटे हे शेतकरी आणि कामगारांत फूट पाडण्याचे कुटील कारस्थान करत असून कामगारांवर खोटेनाटे आरोप करत आहेत. दौलतविषयी आस्था असलेल्या शेतकरी कामगार यांनी भक्कम लढा उभा करावा, जिल्ह्यातील शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल अशी ग्वाही शिवसेना जिल्हा सह-संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आपल्या भाषणात दिली.
२८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत दौलत प्रशासनाने समाधानकारक तोडगा न काढल्यास कामगारांना लढ्याचे पुढील पाऊल उचलावे लागेल. त्याच्या होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी अथर्वच्या प्रशासनावर राहील. हा चंदगड तालुका साखर कामगार संघटनेचे सचिव प्रदीप पवार यांनी मांडलेला ठराव एकमताने आणि घोषणांच्या निनादात मंजूर करण्यात आला.
कामगार नेते कॉ अतुल दिघे, सुभाष देसाई, शेखर गावडे, नंदकुमार गावडे. श्रीधर शिंदे, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे, तानाजी गडकरी, दशरथ दळवी, रवी नाईक, महादेव फाटक, नारायण तेजम, दिलीप कदम, संजय देसाई, सुरेश पाटील, संजय हादगोळकर आदींनी शेतकरी कामगारांच्या लढ्याला पाठिंबा देणारी भाषणे केली. सूत्रसंचालन अशोक गावडे यांनी केले. सभेला शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार महादेव फाटक यांनी मानले.

No comments:
Post a Comment