वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईचे गडहिंग्लज, आजरा तालुक्यात वाटप, चंदगड मध्ये कधी? - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2025

वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईचे गडहिंग्लज, आजरा तालुक्यात वाटप, चंदगड मध्ये कधी?

उत्तुर येथे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाला धनादेश देताना वनपाल सागर पवार, रुद्रगोंडा पाटील, उमेश आपटे, किरण आमणगी आदी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

        आजरा तालुक्यातील उत्तूर  येथे जून २०२५ मध्ये कोल्ह्याच्या हल्ल्यात कृष्णा मारुती दळवी यांच्या दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्याच्या नुकसान भरपाईचा धनादेश वनपाल सागर पोवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी वनरक्षक रुद्रगोंडा पाटील, माजी जिप. अध्यक्ष उमेश आपटे, सरपंच किरण शंकर आमणगी, राजू खोराटे, महेश करंबळी, अशोक पाटील उपस्थित होते.

         या घटनेचा पंचनामा महाराष्ट्र शासनाचे सुवर्णपदक विजेते वनपाल सागर पोवार यांनी तयार करून वरिष्ठ कार्यालयास सादर केला होता. नुकसान भरपाई मिळवून देण्यास त्यांना सहा. वनसंरक्षक विलास काळे व परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी प्रकरणास तात्काळ मंजुर करून अनुदान पूर्तता केली. यामुळे वन्यप्राणी बाधित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

       चंदगड तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. याशिवाय शिवारातील उभ्या पिकांची रानडुक्कर, गवे यांच्याकडून रोज नासधूस सुरू आहे. तथापि यापैकी कुणालाही अद्याप अनुदान मिळाल्याची बातमी नाही. ही नुकसान भरपाई केव्हा मिळणार? अशी विचारणा वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे हैराण झालेले चंदगड तालुक्यातील शेतकरी करत आहेत. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करून जातात. मात्र बाधित शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई रकमेची वर्षानुवर्षे वाट पाहत बसावे लागते.

No comments:

Post a Comment