करेकुंडी शाळेचे शिक्षक सोनाप्पा कोकितकर यांना अविष्कार फाउंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2025

करेकुंडी शाळेचे शिक्षक सोनाप्पा कोकितकर यांना अविष्कार फाउंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    मराठी विद्या मंदिर करेकुंडी ता. चंदगड शाळेचे विषय शिक्षक सोनाप्पा दत्तू कोकितकर, मुळगाव बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) यांना आविष्कार फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. यशोदा टेक्निकल कॅम्पस ब्ल्यू सेमिनार हॉल, इंजिनिअरिंग कॉलेज इमारत, वाडे फाटा- सातारा येथे शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दशरथ सगरे (चेअरमन यशोदा टेक्निकल कॅम्पस)  होते. कोकितकर यांना हा पुरस्कार दशरथ सगळे दिलीप दीक्षित यांच्या हस्ते प्रा. डॉ. अजिंक्य सगरे, प्रदीप कांबळे, सुनील जगताप, अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक पत्रकार संजय पवार, राष्ट्रीय महासचिव सुनिता केदार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

  कोकितकर यांनी गेल्या ३० वर्षांत शिक्षण, सामाजिक, कृषी, सहकार, पर्यावरण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन अविष्कार फाउंडेशनने सोनाप्पा कोकितकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली. 

  अविष्कार फाउंडेशनच्या या पुरस्कारापूर्वीच त्यांना देशातील अग्रगण्य मराठी दैनिक पुढारी समूहाच्या वतीने दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित झाला असून या पुरस्काराचे वितरण शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच कोल्हापूर येथे होणार आहे. या दोन्ही पुरस्कारांच्या निमित्ताने कोकितकर यांचेवर शैक्षणिक वर्तुळात कौतुकाचा वर्ष होत आहे.

No comments:

Post a Comment