इंद्रायणी भाताचे दर प्रति क्विंटल ३४०० वरून २७०० पर्यंत गडगडले, शेतकऱ्यांना आर्थिक फटका..! भाताच्या उत्पन्नात मोठी घट, हंगाम शेवटच्या टप्प्यात - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2025

इंद्रायणी भाताचे दर प्रति क्विंटल ३४०० वरून २७०० पर्यंत गडगडले, शेतकऱ्यांना आर्थिक फटका..! भाताच्या उत्पन्नात मोठी घट, हंगाम शेवटच्या टप्प्यात

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्यात भाताच्या सुगीचा हंगाम जोरात सुरू असून शेवटच्या टप्प्यात आला  आहे. यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे पिके तरारुन आली होती. शेतीतून भाताचे विक्रमी उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तथापि भात पीक कापणीला आले असताना पावसाळा सुमारे महिनाभर अधिक लांबला, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. भात कापणीची सराई गेली. परिणामी तब्बल महिनाभर उशिराने भात कापणी सुरू झाली. याचाच फटका उत्पन्नात दिसू लागला आहे. अंदाजापेक्षा उत्पन्नात ३० ते ३५ टक्के तूट येत आहे. ज्या ठिकाणी १० क्विंटल उत्पन्न अपेक्षित होते; तिथे ६-७ क्विंटल उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

   एकीकडे उताऱ्यात घट सुरू असताना दुसरीकडे दरात ही मोठी घट झाली आहे. गेल्या केवळ पंधरा दिवसात इंद्रायणी भाताचा दर प्रती क्विंटल ३४०० रुपयांवरून २७०० इतका खाली आला आहे. म्हणजे पंधरा दिवसात दर ७०० रुपयांनी दर घसरले आहेत. विशेषतः येथील शेतकरी इंद्रायणी भात हे व्यापारी पीक म्हणूनच करतात. त्यामुळे मळणी झाल्यानंतर भाताची साठवणूक करण्याऐवजी ते थेट विक्रीसाठीच नेण्याचा येथील शेतकऱ्यांचा कल असतो. तथापि दर मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे भारताची विक्री की साठवणूक करायची या द्विधा मनःस्थितीत शेतकरी दिसत आहे.

     दुसरीकडे चंदगड तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या ऊस पिकाची अति पावसामुळे दैना झाली असून ऊसाला मावा, तांबेरा आदी रोगांनी ग्रासले आहे. परिणामी ऊस उत्पादनातही यंदा मोठी घट अपेक्षित आहे. एकंदरीत खते, मजुरी, मशागत, भांगलन यांचे वाढलेले दर पाहताभात शेती व ऊस शेतीतून पीक कितीही चांगले असले तरी प्रति एकर १० हजार रुपये ही फायदा मिळणे अशक्य बनले आहे.

  शेतकरी संघटनांचे  दुर्लक्ष, व्यापारी ठरवतील तोच हमीभाव

   उसाच्या दरासाठी आग्रही असणाऱ्या शेतकरी संघटना भाताचा दर किंवा हमीभावासाठी आग्रही नाहीत याबाबत  शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भात दराबाबत शासन किंवा शेतकरी संघटना यांचा कोणताच वचक नसल्याने व्यापारी मनमानी पद्धतीने दर ठरवून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करत आहेत. यात गरीब शेतकरी लुबाडला जात आहे. भात साठवणुकीची कोणतीच व्यवस्था नसल्याने शेतकरी मातीमोल भावाने भात विक्री करताना दिसत आहेत. यामुळे ' मुकी बिचारी कुणी हाका' अशी भात पीक उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

No comments:

Post a Comment