“भारतीय संविधान हे लोकशाहीचे सर्वात सामर्थ्यवान शस्त्र” — प्रा. ए. डी. कांबळे, माडखोलकर महाविद्यालयात संविधान दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2025

“भारतीय संविधान हे लोकशाहीचे सर्वात सामर्थ्यवान शस्त्र” — प्रा. ए. डी. कांबळे, माडखोलकर महाविद्यालयात संविधान दिन साजरा

माडखोलकर महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमात बोलताना प्रा. ए. डी. कांबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        “भारतीय संविधान हे जगातील सर्वात प्रगतिशील, सर्वसमावेशक आणि लोकशाहीचे सर्वात सामर्थ्यवान शस्त्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूल्यांमुळे भारत एक न्यायाधिष्ठित राष्ट्र म्हणून उभा राहिला,” असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. ते माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व खेडूत प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

        प्रा. कांबळे म्हणाले, संविधानातील समानता, बंधुता, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय या तत्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. संविधान हा फक्त कायद्याचा ग्रंथ नसून भारताचा अनमोल असा ठेवा आहे. लोकशाहीदृष्ट्या मूल्याधिष्ठित असा पाया आहे. आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणारा नागरिक तयार झाला तरच देशाची प्रगती अधिक वेगाने होईल. त्यांनी युवकांना संविधानाचा सखोल अभ्यास करण्याचे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकशीलता व बंधुता वाढवण्याचे आवाहन केले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच संविधान दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाहीची जपणूक करण्याची जबाबदारी लक्षात आणून देणारा दिवस आहे. त्यांनी संविधानाची अंमलबजावणी प्रत्यक्ष जीवनात करण्याचे आणि समाजातील बदलांसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

        कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे समन्वयक  सूत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी केले. डॉ. एस. डी.गावडे यांनी स्वागत व प्रस्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी संविधानाबद्दल जनजागृती करणे ही आजची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार क्रीडा संचालक  प्रा. एस. एम. पाटील यांनी मानले.

        या कार्यक्रमाला डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. आर. के. सूर्यवंशी, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. एस. सावंत, श्रीनिवास पाटील तसेच अनेक प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात संविधानाविषयी जागरूकता वाढीस लागून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची भक्कम पायाभरणी झाली.

No comments:

Post a Comment