गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील अनेक ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा झाल्याचे आढळून आले. शुक्रवारी दुपारी अचानक काही गावकऱ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत तत्काळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्यकार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तत्काळ गावामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्याचबरोबर अत्यावस्थ लोकांना अधिक उपचारासाठी नेसरी, गडहिंग्लज, कानडेवाडी व इतर ठिकाणी तत्काळ हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, सांबरे येथील मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील जवळपास सर्वच ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. परंतु दुपारनंतर अचानक अनेक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. ग्रामस्थांना उलट्या, पोटदुखी चा त्रास होऊ लागला. गावातील जवळपास २००-३०० ते लोकांना हा त्रास होऊ लागला. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना ही बाब समजतात त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी, प्रांताधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करुन गावांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्याचबरोबर अत्यावस्थ लोकांना नेसरी व गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष विजय पाटील, हेमंत कोलेकर, नेसरी गावच्या सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर, भाजपा महिला संयोजिका सौ. भारती जाधव, गावच्या सरपंच सौ. ज्योती खराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत आमदार शिवाजी पाटील यांनी रुग्णांलयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे स्वीय सहाय्यक मार्फत परीस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सुचना केल्या. आमदार पाटील यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. रात्री उशिरा समजलेल्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे.

No comments:
Post a Comment