सर्वसामान्य जनतेच्या व्यापक हितासाठी न्यायव्यवस्थेची आणि कायद्यांची निर्मिती - ॲड. अनंत कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2025

सर्वसामान्य जनतेच्या व्यापक हितासाठी न्यायव्यवस्थेची आणि कायद्यांची निर्मिती - ॲड. अनंत कांबळे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     भारतीय न्यायव्यवस्था व संसदेने संमत केलेले कायदे हे सर्वसामान्य जनतेच्या व्यापक हितासाठी निर्माण झाले असून, अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी ते समर्थ मार्ग उपलब्ध करून देतात. नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण आणि सुरक्षितता हा भारतीय न्यायव्यवस्थेचा मूळ हेतू असल्याचे प्रतिपादन चंदगड येथील ज्येष्ठ वकील ॲड. अनंत कांबळे यांनी केले. ते र.भा माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायालयीन प्रक्रिया या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.

        ॲड. कांबळे पुढे म्हणाले की, गुन्हेगाराला फक्त शिक्षा करणे हा न्यायव्यवस्थेचा उद्देश नाही, तर ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे आणि गुन्ह्यांना प्रवृत्त झालेल्या व्यक्तींमध्ये सुधारणा करून निकोप समाज व्यवस्थेची निर्मिती करणे हेच भारतीय न्यायदानाचे प्रमुख उद्दिष्ट  आहे. त्यामुळे भारताची न्यायव्यवस्था इतर देशांपेक्षा वेगळी आणि मानवतावादी ठरते. त्यांनी तालुकापातळीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या न्यायालयीन व्यवस्थेची रचना, कोणत्या न्यायालयात कोणते दावा-खटले चालतात, न्यायालयीन प्रक्रिया कशी सुरू होते, पुरावे व साक्ष तपासणी, युक्तिवाद आणि न्यायनिर्णय कसा होतो याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

        यावेळी बोलताना संस्थेचे ऑडिटर ॲड. प्रा. एन. एस. पाटील म्हणाले की, भारतात आधुनिक कायद्यावर आधारित न्यायव्यवस्था ब्रिटिश कालखंडात रूढ झाली. तत्पूर्वी मनुस्मृती, शरियत व कुराण यांसारख्या धार्मिक कायद्यांच्या आधारे न्यायदान होत असल्याने त्यामध्ये पारदर्शकता व समतावादी दृष्टिकोन नव्हता. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारून नव्या कायद्यांची निर्मिती करून ते लागू केले आणि ते कायदे आजही समाजाच्या हितासाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

        अध्यक्षीय समारोप करताना डॉ. गोरल म्हणाले की, न्यायदानाच्या प्रक्रियेत काही किरकोळ त्रुटी जसे वेळेचा व पैशाचा अपव्यय होत  दिसून येतअसला तरी भारतीय न्यायव्यवस्था आजही सर्वसामान्यांमध्ये विश्वासार्हतेने उभी आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्त्वाच्या आधारे न्याय मिळण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आजही मिळत आहे, ही आपल्या व्यवस्थेची मोठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी नमूद केले.

          या कार्यक्रमात न्यायालयीन प्रक्रिया अनुषंगाने विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे ॲड. कांबळे आणि प्रा. पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक प्रा. डॉ. टी. ए. कांबळे यांनी करून कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश कथन केला. सूत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी केले. कार्यक्रमास डॉ. एस. एस. सावंत, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. महादेव गावडे, कुमारी पी. सी. देशपांडे, डॉ. एन. के. पाटील, अनिल पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment