कोवाड गावाचे 'साहित्य तीर्थक्षेत्र कोवाड' असे नामकरण करावे...! साहित्यिकांची मागणी, सरपंच सौ. भोगण यांनी काय केली घोषणा? - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2025

कोवाड गावाचे 'साहित्य तीर्थक्षेत्र कोवाड' असे नामकरण करावे...! साहित्यिकांची मागणी, सरपंच सौ. भोगण यांनी काय केली घोषणा?

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        स्वामीकार पद्मश्री रणजीत देसाई व त्यानंतर पांडुरंग कुंभार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या साहित्यामुळे कोवाड गावाचे नाव जगभर झाले आहे. येथील साहित्य प्रेमी मंडळींनी साहित्य क्षेत्रातील हिरे वेचून त्यांना पुरस्कारांच्या माध्यमातून  प्रेरणा देण्याचे काम सातत्याने केले आहे. स्व. रणजीत दादांमुळे जगभरातील साहित्य, संगीत, चित्रपट, रंगभूमी, राजकारण क्षेत्रातील दिग्गज मंडळी इथे नतमस्तक झाली आहेत व अजूनही होत आहेत. अशा या गावाचे 'साहित्य तीर्थक्षेत्र कोवाड' असे नामकरण झाले पाहिजे. असे प्रतिपादन साहित्य समीक्षक अरुण काकडे यांनी केले. ते कोवाड येथील साहित्यिक पांडुरंग कुंभार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या 'वेगळ्या वाटा' उत्कृष्ट साहित्य पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक, चित्रपट निर्माते व पत्रकार विजयकुमार दळवी होते.



        पद्मश्री रणजीत देसाई व गुरुवर्य पांडुरंग कुंभार यांच्या प्रतिमा पूजनानंतर. कुंभार कुटुंबीयांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक विनायक कुंभार यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय साहित्यिक पांडुरंग जाधव यांनी केला. गेल्या चार वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या 'वेगळ्या वाटा' उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २०२५ चे मानकरी पुढील प्रमाणे. ललित लेखन विभाग प्रथम पुरस्कार डॉ. सुनंदा शेळके (प्रतिभेच्या पारंब्या), द्वितीय पुरस्कार श्रीराम ग. पचिंद्रे, वृत्तसंपादक दैनिक पुढारी (सारांश),  तृतीय पुरस्कार सतीश तीरोडकर यांच्या (अनुभवी अंतरी जैसे) या पुस्तकाला देण्यात आला. चरित्र विभागात प्रथम पुरस्कार केशव वसेकर (वसा केशवाचा), द्वितीय पुरस्कार जयवंत जाधव  (वळणं आणि वळण), तृतीय पुरस्कार मधुकर येवलुजे (समाज मनाची माणसं) या पुस्तकाला देण्यात आला. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

       कार्यक्रमात यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठान मार्फत दिला जाणाऱ्या पुरस्कारासोबत सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना अकराशे रुपये विशेष पुरस्कार देण्याची जाहीर केले. त्याचबरोबर याच कार्यक्रमातून तालुक्यातील एका उदयोन्मुख लेखकाची निवड केल्यास त्याला पाच हजार रुपये पुरस्कार म्हणून देण्याचे जाहीर केले. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, किणी कर्यात शिक्षण संस्था अध्यक्ष अशोकराव देसाई, पुरस्कारा प्राप्त सर्व साहित्यिकांची समायोजित भाषणे झाली.  यावेळी उपसरपंच रामचंद्र व्हन्याळकर, नारायण कणुकले, माजी उपसरपंच चंद्रकांत कुंभार, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, गुंडोपंत देसाई आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विजय कांबळे यांनी केले. संजय कुंभार यांनी आभार मानले.  कार्यक्रमास कोवाड परिसर व चंदगड तालुक्यातून साहित्य प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

'साहित्य तीर्थक्षेत्र कोवाड' प्रवेश कमानीची घोषणा 

     यावेळी उपस्थित कोवाडच्या सरपंच सौ. अनिता भोगण यांनी साहित्यिकांच्या सूचनेचा आदर करत गावाच्या प्रवेशद्वारावर कमान उभारून त्यावर 'साहित्य तीर्थक्षेत्र कोवाड' असा उल्लेख करण्याचे तात्काळ जाहीर केले. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध भागातून आलेल्या साहित्यिकांनी या घोषणेबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment