चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
येथील दि न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा नेहमीच प्रयोगशील आणि उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात ओळखली जाते. पुस्तकी शिक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, या हेतूने शाळेत सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. याचाच एक उत्तम नमुना म्हणून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील एक अनोखा प्रयोग यशस्वीपणे साकारला.
मराठीच्या पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध लेखिका गोदावरी परुळेकर यांच्या ‘पाड्यावरचा चहा’ या पाठातील वर्णन वाचून विद्यार्थ्यांनी केवळ धडा समजून न घेता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला. पाठात वर्णन केलेल्या वारल्यांनी चुलीवर बनवलेल्या चहाप्रमाणेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात पारंपरिक चुलीवर गुळाचा चहा तयार केला.
या उपक्रमासाठी कुणी घरून गुळ आणला, कुणी चहापावडर, तर कुणी चहाचे भांडे आणि साहित्य आणले. सर्वांनी मिळून चुल पेटवली, पाणी उकळवले, गुळ विरघळवला आणि सुगंधी गुळाचा चहा तयार केला. तयार झालेला हा चहा विद्यार्थ्यांनी प्रेमाने शिक्षक व सहविद्यार्थ्यांना दिला. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, कुतूहल आणि आनंद ओसंडून वाहत होता.
पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात आणल्यामुळे विद्यार्थ्यांना सहकार्य, श्रमप्रतिष्ठा, परंपरेचे महत्त्व आणि अनुभवाधारित शिक्षण यांचा सुंदर प्रत्यय आला. या उपक्रमासाठी अध्यापक संजय साबळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
या अभिनव उपक्रमाचे शाळेचे प्राचार्य आर. पी. पाटील तसेच उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी विशेष कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी धडे केवळ वाचू नयेत, तर ते जगावेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले. हा उपक्रम म्हणजे अनुभवातून शिक्षण देणाऱ्या शाळेच्या वाटचालीतील एक प्रेरणादायी पाऊल असून, दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडची प्रयोगशील शैक्षणिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला आहे.

No comments:
Post a Comment