गोवा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेची चमकदार कामगिरी, एक सुवर्ण, दोन कांस्य पदकांची कमाई - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2025

गोवा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेची चमकदार कामगिरी, एक सुवर्ण, दोन कांस्य पदकांची कमाई

५० मीटर IM मध्ये गोल्ड; बटरफ्लाय व फ्रीस्टाईल प्रकारात ब्राँझ मेडल, के.एल.ई. स्विमिंग क्लबमध्ये प्रशिक्षण — प्रशिक्षक, शाळा व प्रायोजकांच्या पाठिंब्यामुळे यशाची भरारी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        गोवा येथे २० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या गोवा स्विमिंग असोसिएशन राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावचा उदयोन्मुख जलतरणपटू भगतसिंग भारत गावडे याने नेत्रदीपक कामगिरी करत एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदके पटकावली आहेत.

या स्पर्धेत भगतसिंगने

🔹 ५० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले (IM) प्रकारात सुवर्ण पदक,

🔹 ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदक,

🔹 ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक

मिळवत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली.

    या यशाबद्दल त्याला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, भगतसिंगने यापूर्वीही विविध राज्यस्तरीय व आंतरशालेय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण पदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. 

    सध्या भगतसिंग बेळगाव येथील के. एल. ई. स्विमिंग क्लब येथे नियमित प्रशिक्षण घेत असून तो मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. लहान वयातच राष्ट्रीय पातळीवरील स्वप्नांसाठी तो सातत्याने कठोर परिश्रम घेत आहे.

    या यशामागे प्रशिक्षक अजिंक्य मेंडके, राजेश शिंदे, अतुल धुडूम, इम्रान सर, गोर्धन सर, सतीश यादव, संजू सर आणि महेश सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच के.एल.ई. इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल, कुवेंपूनगर बेळगाव येथील संपूर्ण स्टाफचेही सहकार्य लाभले.

      याशिवाय रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर (हिंडलगा) आणि उमेश कलघटगी यांनी दिलेल्या पाठिंबा व प्रोत्साहनामुळे भगतसिंगचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. लहान वयात मिळवलेले हे यश भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भगतसिंग गावडे हा नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्याची क्षमता बाळगतोय, अशी भावना क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment