“जीवनात योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजे गणित” – प्रा. पुंडलिक गावडे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2025

“जीवनात योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजे गणित” – प्रा. पुंडलिक गावडे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    येथील दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. पी. पाटील होते. त्यांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पुंडलिक गावडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “रामानुजन यांनी मांडलेल्या गणितीय सूत्रांनी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले. गणित हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जीवनात योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच गणित होय.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

        यावेळी विद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक विद्या शिंदे, ओंकार पाटील, गजानन तरवाळ व आकाश चव्हाण यांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

        विद्यालयाचे ग्रंथपाल शरद हदगल यांनी गणित विषयावरील विविध संदर्भग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात गणितीय सूत्रांवरील मजेदार उखाण्यांचे सादरीकरण इरा गडकरी, मनाली कांबळे, संस्कृती  कांबळे  गार्गी नांगरे कार्तिकी गावडे  व द्रुवाकुर काणेकर यांनी करून वातावरण प्रसन्न केले.

        या कार्यक्रमास उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, जे. जी. पाटील, टी. व्ही. खंडाळे, वैशाली पाटील, कोळी मॅडम, साधना भोसले यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावळे यांनी केले, तर भाग्यश्री पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

        राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण व्हावी आणि गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment