'आजरा अर्बन'च्या संचालकपदी पारगडचे मुंबईस्थित उद्योजक कान्होबा माळवे यांची बिनविरोध निवड, संचालक मंडळातील ११ नव्या चेहऱ्यापैकी चंदगड तालुक्यातील एकमेव चेहरा - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2025

'आजरा अर्बन'च्या संचालकपदी पारगडचे मुंबईस्थित उद्योजक कान्होबा माळवे यांची बिनविरोध निवड, संचालक मंडळातील ११ नव्या चेहऱ्यापैकी चंदगड तालुक्यातील एकमेव चेहरा

कान्होबा माळवे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये ३५ शाखांसह १८०० कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या मल्टिस्टेट असलेल्या आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांच्या पुढाकाराने हे यश मिळाले. बिनविरोध निवड झालेल्या १८ संचालकापैकी ११ संचालक हे नवीन चेहरे आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील कान्होबा माळवे यांची निवड झाली आहे. बँकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील चंदगड तालुक्यातील ते एकमेव संचालक आहेत. सहकारातील एक नावाजलेली बँक म्हणून या बँकेकडे बघितले जाते. यावर संचालक म्हणून निवड झाल्याने श्री. माळवे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. 

     यावेळी निवडीनंतर संचालक कान्होबा माळवे यांनी सी. एल. न्युज प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, ``आजरा अर्बन बँकेच्या स्थापनेपासून बँकेची घोडदौड सुरु आहे. बँकेला आतापर्यंत लाभलेले संचालक मंडळामध्ये चांगले लोक काम करतात. कर्तृत्ववान नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी त्यांचा शोध सुरु असतो. बँकेच्या ३५ शाखा असून त्यापैकी बहुतांश शाखा या बँकेच्या मालकीच्या आहेत. बँकेच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोकही एकत्र येतात, हे त्यांचे वैशिष्ट आहे. सहकारातील अग्रग्ण्य बैंक म्हणून आजरा अर्बन बँकेचा नावलौकिक आहे. सभासदांच्या पाठबळावर दुसऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.``

    "बँकेच्या मुंबई येथील बोरीवली व डिलाईरोडला असलेल्या शाखांच्यामध्ये मी गेली १५ वर्षे सल्लागार म्हणून काम करत आहे. या दरम्यान अशोकअण्णा चराटी यांनी मला संचालक मंडळामध्ये सामील करुन घेण्याबाबतचा विचार व्यक्त केला. त्यांच्या विनंतीला मान देत मी धावपळीमध्ये असतानाही या निवडणुकीमध्ये अर्ज भरला होता. मात्र १८ जागांसाठी १८ अर्ज आल्याने बँकेची निवडणुक बिनविरोध झाल्याने यातून माझी निवड झाली आहे."

   कान्होबा माळवे हे मुळचे चंदगड तालुक्यातील पारगड येथील आहेत. मात्र ते  व्यवसायानिमित्त काही वर्षापासून मुंबईला वास्तव्याला आहेत. तसेच चंदगड तालुक्यातील  खेडूत शिक्षण संस्थेचे ते स्विकृत संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment