र. भा. माडखोलकर महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात साजरा, बालवीरांच्या शौर्याने राष्ट्रघडणीला प्रेरणा – प्रा. ए. डी. कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2025

र. भा. माडखोलकर महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात साजरा, बालवीरांच्या शौर्याने राष्ट्रघडणीला प्रेरणा – प्रा. ए. डी. कांबळे

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रा.ए. डी. कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एल.भादवणकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मानसशास्त्र विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, समुपदेशन व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच वीर बाल दिवसाचे महत्त्व विशद करताना शीख संप्रदायातील  बालवीरांचे शौर्य, त्याग व राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरतात,” असे नमूद केले.

        प्रमुख पाहुणे प्रा. ए. डी.कांबळे यांनी आपल्या सविस्तर व अभ्यासपूर्ण भाषणातून वीर बाल दिवसाचा ऐतिहासिक संदर्भ उलगडला. त्यांनी गुरु गोबिंदसिंग महाराजांचे पुत्र साहिबजादे यांचे उदाहरण देत सांगितले की, अत्यंत लहान वयातही त्यांनी अन्यायाविरुद्ध उभे राहून धर्म, स्वातंत्र्य व राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

        “इतिहास केवळ भूतकाळाची नोंद नसून तो वर्तमानाला दिशा देणारा व भविष्य घडवणारा असतो. बालवीरांचे शौर्य आजच्या विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, आत्मविश्वास, देशप्रेम व नैतिक मूल्ये रुजवते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

        आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी, चारित्र्यनिर्मिती व मानवी मूल्ये जोपासावीत, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करून आपल्या जीवनात त्यांचे आदर्श अंगीकारावेत, असे सांगत त्यांनी भाषणाची सांगता केली.

        अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. डी. गोरल यांनी वीर बाल दिवसाचे औचित्य अधोरेखित केले. बालवीरांचे त्यागमय जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असून, अशा उपक्रमांमुळे महाविद्यालयीन जीवनात मूल्याधिष्ठित शिक्षण रुजते, असे त्यांनी नमूद केले. मानसशास्त्र विभागाच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एन. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एन. के. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. महादेव गावडे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. शाहू गावडे यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments:

Post a Comment