विकसित भारत या संकल्पनेत पर्यावरण संरक्षणाची गरज आहे - संजय कदम, कालकुंद्री येथे ५३ वे चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2025

विकसित भारत या संकल्पनेत पर्यावरण संरक्षणाची गरज आहे - संजय कदम, कालकुंद्री येथे ५३ वे चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

 


 चंदगड : सी एल वृत्तसेवा

    हरित ऊर्जा, पर्यावरण संरक्षण,जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन या गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व असून विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न  पूर्ण होण्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज आहे असे विचार लक्ष्मी सिविल इंजीनियरिंग सर्विसेस प्रा. लि. कोल्हापूरचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय कदम यांनी  श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार जुनिअर कॉलेज कालकुंद्री येथे संपन्न झालेल्या ५३ व्या चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी  मांडले.

   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष जी. एस. पाटील होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई जाधव यांच्या हस्ते चांद्रयान प्रतिकृतीचे प्रक्षेपण करून उदघाटन करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी प्रास्ताविक केले तर विद्यालयातील जेष्ठ शिक्षक एम. व्ही. कानूरकर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी खेडूत शिक्षण मंडळाचे ऑडिटर प्रा. एन. एस. पाटील, खेडूतचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, सेक्रेटरी एम. एम. तुपारे, खजिनदार व्ही. सुतार, संचालक एस. एम. फर्नांडिस, एम. बी. पाटील, विस्तार अधिकारी सौ. सुमन सुभेदार, नामदेव माईनकर, केंद्रप्रमुख पुंडलिक गुरवप्राथमिक व माध्यमिक संघटनांचे पदाधिकारी, मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

     श्री संजय कदम पुढे म्हणाले, "देशातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे .यासाठी आपणाला मिळणारे पाणी जबाबदारीने वापरा, जलसाक्षर व्हा, जलदूत व्हा म्हणजे भारत शुद्ध पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करता येईल."

    सकाळच्या सत्रा मध्ये सरस्वती विद्यालय व केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्रीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते.

     यावेळी उच्च प्राथमिक गटातून ६९, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून ५०, प्राथमिक शिक्षक ७, माध्यमिक शिक्षक ५, प्रयोगशाळा परिचर ५ तर दिव्यांग २ विद्यार्थ्यांनी आपली उपकरणे मांडली होती.

      कार्यक्रमाचे निवेदन व्ही. पी. कांबळे व नीता कुंभार यांनी केले. तर उपस्थित आमचे आभार मुख्याध्यापक ई. एल. पाटील यांनी मानले यांनी मानले.

No comments:

Post a Comment