गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
शारीरिक हालचाली, बौद्धिक काम व एकाग्रता यांचा अगदी जवळचा संबंध असून खेळात सहभाग घेतल्याने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक, भावनिक, सामाजिक फायदे मिळत असतात. खेळ ही केवळ यशाची शिडी नसून उत्तम आरोग्याची भरभक्कम पायाभरणी असल्याचे प्रतिपादन अस्थिरोग तज्ञ डॉ .अजित पाटोळे यांनी जागृती हायस्कूल,गडहिंग्लज येथील वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे अध्यक्षस्थानी होते. वीरभद्र पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार गुरव व संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत यांनी केले. सचिन मगदूम यांनी पाहुणे परिचय करून दिला. मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित व आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. कु. चार्वी कुंभार हिने खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. कु. केतकी कोंडस्कर, कु. केतकी माने, कु. सेजल पाटील, नैतिक तेलवेकर, हर्षवर्धन माने या नैपुण्य प्राप्त खेळाडूंनी क्रीडाज्योत कै. डॉ. एस.एस.घाळी यांच्या पुतळ्या जवळून धावत मैदानाला वेडा घातला.
पुढे बोलताना डॉ. अजित पाटोळे म्हणाले, "आधुनिक जीवनशैली, स्क्रीन टाईम मध्ये झालेली वाढ, शहरीकरण आणि मैदानाचा अभाव यामुळे शारीरिक हालचाली मंदावलेल्या आहेत. खेळातील भाग हा फक्त जिंकण्यासाठीचा नसतो तर पराभवातून पुन्हा उभे राहण्याची ऊर्जा निर्माण करत असतो. खेळात कोणताही न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यश खेचून आणता येते." श्रीरंग तांबे यांनी आरोग्य, यश आणि आनंद यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा असतो असे सांगितले.
यावेळी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, विरभद्र पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार गुरव, उपमुख्याध्यापक बी. जी. कुंभार, पर्यवेक्षक महंतेश दड्डी, शाळेचा जी. एस. निलेश जाधव, एल. आर. कु. समीक्षा मोरे यांसह सर्व शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन गटात मुला मुलींच्या कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, रस्सीखेच, बुद्धिबळ, कुस्ती व धावणे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षकवृंद परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी तर आभार प्रकाश हारकारे यांनी मानले.

No comments:
Post a Comment