![]() |
| मार्गदर्शन कार्यशाळेच्या प्रसंगी बोलताना राजेंद्र शिवनगेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील बागिलगे रामपूर विद्यालय व जुनिअर कॉलेज, रामपूर येथे इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा शिक्षण विभाग पंचायत समिती, चंदगड यांच्या वतीने घेण्यात आली. या कार्यशाळेत ‘काँपीमुक्त अभियान’ आणि ‘बोर्ड परीक्षेचा राज्यमार्ग’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नंदकुमार होनगेकर, केंद्रप्रमुख (माणगाव केंद्र) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना नंदकुमार होनगेकर म्हणाले की, बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा असून, यामध्ये शिस्त, प्रामाणिकपणा व नियमपालन अत्यंत महत्त्वाचे आहे. काँपीमुक्त अभियान हे केवळ प्रशासनापुरते मर्यादित नसून, विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण यंत्रणेची सामूहिक जबाबदारी आहे. योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण अभ्यास म्हणजेच बोर्ड परीक्षेचा खरा राज्यमार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना टी. व्ही. पाटील, मुख्याध्यापक (बागिलगे रामपूर विद्यालय व जुनिअर कॉलेज) म्हणाले की, काँपीमुक्त परीक्षा राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांच्या यशाला खरी गुणवत्ता लाभते. परीक्षेतील शिस्त हीच गुणवत्तेची गुरुकिल्ली असून, विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवावा, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. एन. शिवणगेकर यांनी केले. कार्यशाळेदरम्यान परीक्षेपूर्व तयारी, अभ्यासाचे नियोजन, केंद्र व्यवस्थापन, पर्यवेक्षणातील दक्षता आणि गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन करुन कॉपीमुक्त परीक्षेसाठी शपथविधी घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर तंत्रस्नेही शिक्षक दिग्विजय फडके, ए. बी. नाईकवाडी, ए. डी. सांबरेकर, पी. जे. बोकडे, व्ही. डी. पाटील, व्ही. जे. कालकुंद्रीकर, के. एस. नाईक हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र शिवणगेकर यांनी आभार मानले.
ही कार्यशाळा बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारी आणि शिक्षकांसाठीही उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यशाळेचे नेटके नियोजन के टी चिंचणगी व पी एस मगदूम यांनी केले.

No comments:
Post a Comment