चंदगड - पारगड-मुंबई (परेल) व चंदगड - कल्याण अशी बससेवा पूर्ववत सुरू करा - प्रवाशांची निवेदनातून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2026

चंदगड - पारगड-मुंबई (परेल) व चंदगड - कल्याण अशी बससेवा पूर्ववत सुरू करा - प्रवाशांची निवेदनातून मागणी

मागणीचे निवेदन देताना प्रवाशी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून - पारगड-मुंबई (परेल) व चंदगड - कल्याण हि बस सेवा पूर्वीपासून चालू होती. परंतु कोरौना संसर्ग देशात आल्यापासून सदर बस सेवा बंद करणेत आली. ती आतापर्यंत बंदच आहे. हि बससेवा पूर्वीप्रमाणे सुरु करावी अशी मागणी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन वाहतूक नियंत्रक विशाल शेवाळे यांच्याकडे दिले आहे. 

      चंदगडपासून हेरे, मोटणवाडी, पाटणे, शिंदेवाडी, कन्वी, मिरवेल, इसापूर, पारगड, रामघाट हा पूर्व भाग डोंगराळ व जंगलांनी वेढलेला आहे. सर्व प्रवाशी जनता यांची रोजगार, शिक्षण, व्यवसाय व वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र सदर बस सेवा बंद केलेने प्रवाशांमध्ये जनतेला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

        या परीसरातील कामगार, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रूग्णांना जीव मुठीत घेऊन खाजगी वाहतूकीचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक गाड्या बदलत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे खूप वेळ, वारेमाप पैसा व प्रचंड शारीरिक त्रास वाढत आहे. सुरक्षित, किफायतशीर व नियमित सार्वजनिक सेवा या भागाची अत्यंत गरज आहे. तरी सदर पूर्व भागातील प्रवाशी जनतेच्या मागणीप्रमाणे व संबंधित ग्रामपंचायत यांचे ग्रामसभा ठरावानुसार सदर बससेवा त्वरीत पूर्ववत सुरू करणेत यावी अशी मागणी केली आहे.  

   या मागणीचे निवेदन माजी जि. प. सदस्य बाबुराव रामा हळदणकर, बाबुराव बाळा हळदणकर, मोहन भरमाण्णा नाईक, प्रकाश बाळकृष्ण पाटकर, पांडुरंग गोविंद पाटकर, अंकुश गोविंद पवार, महादेव दत्ताराम पवार, रघुवीर खंडोजी शेलार, श्रीकांत अर्जुन कांबळे, आप्पाजी गावडे यांनी दिले.

No comments:

Post a Comment