चंदगड : सी. एल. वृत्तसेवा ५-१-२०२६
“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे आपल्या संपूर्ण आयुष्यातून माजी आमदार नरसिंगराव भुजंगराव पाटील यांनी सिद्ध करून दाखवले. सत्य, समता, विवेक आणि शोषितांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्य वेचले. आजही त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत,” असे प्रतिपादन माणगाव येथील श्री माणकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन एस. आर. पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त न. भु.पाटील प्रतिष्ठानच्यावतीने शिवणगे येथील श्री.ताम्रपर्णी विद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एस. आर. पाटील यांनी नरसिंगराव पाटील यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक बाळाराम पाटील होते. स्वागताध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. एस. पी. बांदिवडेकर यांनी प्रास्ताविकात नरसिंगराव पाटील यांच्या कार्याचा धावता आढावा घेत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
एस. आर. पाटील पुढे म्हणाले की, “नरसिंगराव पाटील हे केवळ आमदार नव्हते, तर ते सत्यशोधक विचारांचे पाईक होते. अंधश्रद्धा, जातीय भेदभाव, सामाजिक विषमता याविरोधात त्यांनी निर्भीडपणे आवाज उठवला. समाजात विवेकवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.”
“ज्या काळात अंधश्रद्धा समाजाच्या मुळाशी खोलवर रुजलेल्या होत्या, त्या काळात नरसिंगराव पाटील यांनी निर्भयपणे त्याविरोधात भूमिका घेतली. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सत्यशोधक विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले,” असे सांगत त्यांनी आजच्या पिढीने हे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
नरसिंगराव पाटील हे शेतकरी, कामगार, कष्टकरी, गरीब आणि वंचित घटकांचा खरा आवाज होते. “सत्तेत असो वा सत्तेबाहेर, त्यांनी कधीही तडजोड केली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला,” असेही एस. आर. पाटील यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय नितीन पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन चिगरे सर व दीपक माने यांनी प्रभावीपणे केले. आभार मुख्याध्यापक एस एम भोगण यांनी मांनले
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक नरसिंगराव पाटील, सदस्य संजय उर्फ भुजंगराव द पाटील, सदस्य एल.डी कांबळे, डॉ. पी आर पाटील, प्रा. एस. एम. पाटील,नितीन पाटील, एन डी माने,संस्थेचे सेक्रेटरी एम. एम. तुपारे, एम. व्ही. पाटील, संचालक प्रा.आर. पी. पाटील, गोपाळ बोकडे अनंत सुतार, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, एम. टी. कांबळे, प्रा.एस. व्ही. गुरबे, व्ही. जे. पाटील यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमातून नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या विचारांचे स्मरण करून नव्या पिढीला सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देण्यात आली.

No comments:
Post a Comment