चंदगड : सी. एल. वृत्तसेवा ५-१-२०२६
“आजच्या एआयच्या वेगवान दुनियेत टिकायचे असेल, तर सतत अपडेट राहणे अत्यावश्यक आहे. सकारात्मक विचारच आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. केवळ पैशाच्या मागे धावू नका; माणूस म्हणून जगा. मोठी स्वप्ने पाहा आणि त्या स्वप्नांचा सातत्याने पाठलाग करा, तेव्हाच इतिहास घडतो,” असे प्रेरणादायी प्रतिपादन सुधीर पाटील यांनी केले.
सध्या दक्षिण आफ्रिकेत कार्यरत असलेले सुधीर पाटील हे प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. एआय, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या काळाच्या गरजा यांचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. “तंत्रज्ञानाचा स्वीकार करा, पण मूल्यांची शिदोरी जपा. कौशल्यविकास, सातत्य, आणि आत्मविश्वास हेच यशाचे खरे सूत्र आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अशा प्रेरणादायी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत, “विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता बदलत्या जगाशी जोडणारे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले.
यावेळी मुलांच्या कडून श्री पाटील यांनी आफ्रिकन भाषेतील स्वागत गीत गायले. या कार्यक्रमाला जे. जी. पाटील, एस. जी. साबळे, टी. व्ही. खंदाळे, एस. व्ही. मोहणगेकर, शरद हदगल, वर्षा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी एआय, करिअर नियोजन, कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले.
एकूणच, एआय युगात अपडेट राहण्याचा, सकारात्मकतेचा आणि मूल्याधिष्ठित यशाचा संदेश देणारे हे व्याख्यान उपस्थितांसाठी दिशादर्शक ठरले. आभार वर्षा पाटील यांनी मानले.

No comments:
Post a Comment