![]() |
| एका कार्यक्रमा प्रसंगी अजित पवार व दयानंद काणेकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील काजू प्रक्रिया उद्योगाची मोठी हानी झाली. अजित पवार यांनी 1 एप्रिल 2020 पासून एकूण 5% जीएसटी मधील राज्य सरकारचा असणारा वाटा 2.5% जीएसटी परतावा सुरू केला. तर त्याआधी 12% असणारा व्हॅट रिफंड करण्याचा निर्णय त्यांच्या पुढाकारानेच झाला होता. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो काजू प्रक्रिया उद्योजकांना या व्यवसायात उभारण्याचे बळ मिळालं, त्यांच्या जाण्याने काजू प्रक्रिया उद्योगाची मोठी हानी झाली, असा शोक चंदगड येथील काजू प्रक्रिया उद्योजक व चंदगड अर्बन सहकारी बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांच्या निधनाबद्दल दयानंद काणेकर यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, चंदगड येथे नगरपंचायतच्या विकास कामांसंदर्भात अजितदादा पवार आले होते. त्यादिवशी ते आमच्या घरी स्नेहभोजनासाठी थांबले. पण त्या जेवणापेक्षा महत्त्वाचं हे होतं की, अजितदादा यांनी या स्नेहभोजनाप्रसंगी चंदगडच्या सगळ्या समस्या मनापासून ऐकून घेतल्या. आणि आश्चर्य म्हणजे, त्याच क्षणी अजितदादा यांनी चंदगडसाठी १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आणि अवघ्या ८ दिवसांत त्याचा शासन निर्णयही जाहीर झाला.
हे फक्त नेतृत्व नाही, हे संवेदनशीलपणाचं उदाहरण होतं. आज चंदगडमधील काजू उद्योग ज्या पायावर उभा आहे, तो पाया अजितदादा यांच्यामुळेच मजबूत झाला. या सगळ्यामुळे आमच्यासारख्या उद्योजकांना उभं राहण्याचं बळ मिळालं.
गेल्या ५ वर्षांत आम्ही चंदगड मध्ये जे काही काम करू शकलो, जे काही उभं करू शकलो, ते फक्त अजितदादा यांच्यामुळेच... असा शोक चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment