चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या 'पत्रकार चषक ऑफिसर्स लीग क्रिकेट स्पर्धा २०२६' चा थरार उद्या शनिवार दिनांक ७ मार्चपासून सुरु होणार आहे. बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावरील (हिंडगाव फाटा) इंडॉल क्रीडांगणावर होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन चंदगड न्यायालयाचे न्यायाधीश वामन जाधव यांच्या हस्ते होणार असून यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, बांधकाम अभियंता इफ्तेकार मुल्ला, चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील, आरोग्य अधिकारी बी. डी. सोमजाळ, वनक्षेत्रपाल, गटविकास अधिकारी वृशाली जाधव, चंदगडचे परिक्षेत्र वनअधिकारी तुषार गायकवाड व पाटणेच्या परिक्षेत्र वनअधिकारी शीतल पाटील आदी सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मागील वर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेत १६ तुल्यबळ संघ सहभागी झाले असून यंदा या स्पर्धेत पोलीस, न्यायालय, वनविभाग, बांधकाम, आरोग्य, कृषी, पंचायत समिती, एसटी महामंडळ, पत्रकार, बँक, नगरपंचायत आदी संघ सहभागी होणार आहेत. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत स्पर्धेचे विजेतेपद राष्ट्रीयकृत बँक संघाने तर उपविजेतेपद चंदगड पोलीस संघाने पटकावले होते. प्राध्यापक संघ तिसऱ्या तर एसटी महामंडळ चौथ्या क्रमांकावर राहिले होते.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक ७ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून यावेळी सर्व शासकीय निमशासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व क्रिकेट प्रेमींनी उपस्थित रहावे. असे आवाहन चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्पर्धा विभाग प्रमुख संपत पाटील (संपादक सी एल न्यूज) यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment