चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची तत्काळ सोडवणूक व्हावी, महसूल विभागाचा कारभार लोकाभिमुख व्हावा यासाठी राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रयोग म्हणून चंदगड तालुक्यात शनिवारी (दि. ७) मार्च ते शुक्रवारी (दि. १५) मे या दरम्यान सहा मंडलांतर्गत सहा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण व नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार यांनी दिली.
महसूल विभागाच्या कोवाड मंडळाअंतर्गत समस्यांबाबत कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयाच्या सभागृहात शनिवारी पहिले शिबिर होणार आहे. या शिबिरात संबंधित विभागाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अभियानाचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यानंतर तुर्केवाडी मंडलासाठी ता. १४ तुर्केवाडी येथील ब्रह्मलींग मंदिर सभागृह, माणगाव मंडलासाठी ता. १० एप्रिल रोजी ढोलगरवाडी येथील सातेरी देवी मंदिर सभागृह, नागनवाडी मंडलासाठी ता. १७ एप्रिल रोजी बागीलगे येथील ज्युनिअर कॉलेज सभागृह येथे सदर शिबीर होईल. हेरे मंडलासाठी ता. ८ मे रोजी हेरे येथील सह्याद्री विद्यालयाच्या सभागृहात तर चंदगड मंडलसाठी ता. १५ मे रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात सदर शिबिर होणार आहे.
या शिबिरात वर्ग दोन जमिनीची यादी तयार करणे, भूविकास बँक कर्जाचे बोजे कमी करणे, मयत खातेदार नोंदी कमी करणे, विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करणे, शालेय विद्यार्थ्यांना दाखले वाटप करणे, पीएम किसान नवीन नोंदणी अर्ज स्वीकारणे, जमीन मोजणी बाबत माहिती देणे, सातबारा मधील चूक दुरुस्त करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे व खातेदारांना सातबारा वाटप करणे, अशी विविध सतरा हून अधिक कामांसाठी सदर शिबीर होणार आहे. या शिबिराचा संबंधित नागरिकांनी पक्षकारानी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
.png)
No comments:
Post a Comment