बेळगाव : सी एल वृत्तसेवा
महिलांनी नियमितपणे आर्थिक अल्पबचत करून पैसे साठवल्यास ही रक्कम आपल्या आयुष्यातील समस्या व कुटुंबाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी उपयोगी पडू शकते. त्यामुळे सर्वसामान्य महिलांनी अल्प बचतीची सवय लावून घ्यावी. असे प्रतिपादन कोटक महिंद्रा बँकेच्या पियांगू पोरवाल यांनी केले. त्या केदनूर (ता. जि. बेळगाव) येथील जोतिबा मंदिरात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करत होत्या.
श्रमिक अभिवृद्धी संघटनेच्या वतीने दि. १० मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा संयोजक अँथोनी जेकब होते. कार्यक्रमात गावातील सर्व महिला बचत गट, आशा वर्कर , संजीवनी सदस्य, जन जागरण योजनेच्या सदस्या , श्रमिक अभिवृद्धी संघटनेच्या सदस्य यांना पोरवाल यांनी उपस्थित महिलांना अल्पबचतीचे महत्त्व सांगण्याबरोबरच महिलांसाठी विविध बँका व शासकीय स्तरावरून होणाऱ्या लाभाच्या योजनांबाबत माहिती दिली. यावेळी श्रीमती मंगल कोरे यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे? याविषयी तर डॉ. स्नेहा पाटील यांनी महिलांना उद्भवणारे आजार तसेच त्यांनी निरोगी आयुष्य साठी कोणती काळजी घ्यावी? याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. स्वागत यशवंत भांदुर्गे यांनी केले. पिराजी माहूत यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment