चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
विज्ञानाच्या नवनवीन शोधांमुळे मानवी जीवन सुसह्य झाले असले तरी, केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे विज्ञान नव्हे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि संशोधक वृत्ती जोपासली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती शक्य आहे, असे परखड मत संस्थेचे ऑडिटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये सायन्स फोरमच्या वतीने 'राष्ट्रीय विज्ञान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. ॲड. एन. एस. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक तथा माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. ॲड. एन. एस. पाटील यांनी विज्ञानाच्या विविध पैलूंवर विस्ताराने प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "आजचे युग हे स्पर्धात्मक आणि माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाने आपल्याला जगण्याचे साधन दिले आहे, पण ते साधन कसे वापरावे यासाठी संस्कार आणि वैज्ञानिक विचारांची जोड आवश्यक आहे. समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञानाची कास धरणे हाच एकमेव पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील विज्ञानासोबतच परिसरातील घडामोडींकडे जिज्ञासू वृत्तीने पाहावे. लहान लहान प्रयोगातूनच उद्याचे मोठे शास्त्रज्ञ घडणार आहेत. भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी विज्ञानाची साथ सोडू नये."
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध विज्ञान विषयक पोस्टरचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण पोस्टर्सचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. डॉ. पाटील यांनीही आपल्या मार्गदर्शनात विज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. एम. एम. माने यांनी केले. त्यांनी सायन्स फोरमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कुमारी समीक्षा चिगरे हिने केले, तर उपस्थितांचे आभार प्रा.एम. एस. दिवटे यांनी मानले.
या सोहळ्याला डॉ. एन एस मासाळ प्रा.ए. वाय. जाधव, डॉ. बी. एम. पाटील, प्रा. एल. एन.गायकवाड, डॉ. आर. एन. साळुंखे, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. टी. ए. कांबळे, प्रा. ए. डी. कांबळे, प्राध्यापक आर. व्ही. आजरेकर, प्रा. व्ही. के.गावडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायन्स फोरमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment