चंदगड : सी एल न्यूज
“आजची नवी माध्यमे आणि सोशल मीडिया माहितीचा प्रचंड प्रवाह देतात; मात्र अनेकदा ती आजच्या पिढीला सखोल विचार करण्यासाठी थांबू देत नाहीत. त्यामुळे तरुणांनी माहितीबरोबरच विचार करण्याची सवय जपली पाहिजे. नव्या पिढीपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यांना केवळ शिकवणे नव्हे, तर त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. संवादातूनच विचारांची देवाणघेवाण होते आणि समाज पुढे जातो,” असे प्रतिपादन प्रख्यात लेखक व निर्भीड पत्रकार *संजय आवटे* यांनी केले.
खेडूत शिक्षण मंडळाच्या न. भु. पाटील ज्युनियर कॉलेज, चंदगड तसेच गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनियर कॉलेज, मजरे कारवे यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आपल्या मनोगतात आवटे यांनी पुढे सांगितले की, “व्यवस्थेला नेहमी विचार करणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या माणसांची भीती वाटते; पण खरा बदल घडवणारी ताकद ही विचार करणाऱ्या आणि जागरूक समाजातच असते. भारत हा भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचारांच्या वैविध्याने नटलेला देश आहे. हे वैविध्य समजून घेणे आणि ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे ही शिक्षण संस्थांची व तरुणांची मोठी जबाबदारी आहे.” त्यांच्या या विचारपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थितांना नव्या विचारांची दिशा आणि समाजाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय *प्राचार्य आर. पी. पाटील* यांनी करून दिला. स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना *प्रा आर. पी पाटील* यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सुवर्ण महोत्सव हा संस्थेच्या कार्याचा अभिमानास्पद टप्पा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *अॅड. एन. एस. पाटील* होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “खेडूत शिक्षण मंडळाने चंदगड तालुक्यात केवळ शिक्षण संस्था स्थापन केल्या नाहीत, तर भविष्यातील शैक्षणिक क्रांतीची बीजे पेरली. बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. ही तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीच होती.”
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, सचिव एम. एम. तुपारे, खजिनदार ए. व्ही. सुतार, माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, एस. एम. फर्नांडीस, रामाण्णा पाटील, शामराव मुरकुटे, बाळाराम पाटील, सुनिल काणकेर, प्रा. किसनराव कुऱ्हाडे, सुनिल शिंत्रे, विजयकुमार दळवी, कल्याणराव पुजारी, हेमंत कोलेकर, व्ही. डी. सडेकर, व्ही. एन. कांबळे, विलास नाईक, प्रा. अविनाश तळेकर, प्रा. सी. एम. गायकवाड, प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा. संजय मोरे, प्रा. अभिजीत दुर्गी, प्रा. आर. बी. गावडे, प्रा. एस. बी. गुरबे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे व अर्चना रेळेकर यांनी केले, तर आभार प्राचार्य एन. डी. देवळे यांनी मानले.

No comments:
Post a Comment