चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांची महत्त्वाची आणि प्रतिष्ठित संघटना म्हणून सर्वपरिचित असलेल्या 'शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेच्या' उपाध्यक्षपदी र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. डॉ. शाहू गावडे यांची सलग दुसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली. नेसरी येथील भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या परिषदेमध्ये ही निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर पुन्हा एकदा ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांतील प्राध्यापकांमध्ये ही परिषद अत्यंत आदराची मानली जाते. अशा महत्त्वपूर्ण परिषदेच्या नेतृत्वात डॉ. शाहू गावडे यांचा समावेश झाल्याने समाजशास्त्र विषयातील शैक्षणिक आणि संशोधनात्मक चळवळीला अधिक गती मिळणार आहे.
प्रा. डॉ. शाहू गावडे हे समाजशास्त्र विषयातील एक व्यासंगी आणि अनुभवी प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापनासोबतच त्यांनी संशोधन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत.
यापूर्वी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना डॉ. गावडे यांनी परिषदेच्या कामकाजाला नवी गती दिली. त्यांच्या कार्यकाळात समाजशास्त्र विषयातील संशोधनात्मक देवाणघेवाण वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या याच सक्रियतेची आणि कार्याची दखल घेत, नेसरी येथील परिषदेत उपस्थित तिन्ही जिल्ह्यांतील सर्व सदस्यांनी त्यांच्या नावावर पुन्हा एकदा एकमताने शिक्कामोर्तब केले.
या निवडीबद्दल र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच सीमा भागातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. गावडे यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे समाजशास्त्र परिषदेच्या आगामी उपक्रमांना अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments:
Post a Comment