तुर्केवाडी येथे महिला डॉक्टरवर आज्ञाताकडून शाई फेकून मारहाण करण्याची धमकी, कुद्रेमानी हून घरी परतताना रात्रीची घटना, आरोपी फरार - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2026

तुर्केवाडी येथे महिला डॉक्टरवर आज्ञाताकडून शाई फेकून मारहाण करण्याची धमकी, कुद्रेमानी हून घरी परतताना रात्रीची घटना, आरोपी फरार

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

कुद्रेमानी येथे बेळगाव येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करून रात्री नऊ वाजता आपल्या घरी तुर्केवाडी ताज्यांकडे येथे जात असताना तुडकेवाडी फाटा ते तुर्केवाडी या दरम्यान गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ अज्ञात योगाजनाने डॉक्टर महिलेच्या तोंडावर शाई सदृश्य रसायन फेकून पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली .

 संबंधित डॉक्टर या रोज बेळगाव तालुक्यातील कुद्रेमणी येथे आपल्या क्लिनिकसाठी जात असून रात्री पेशंट आटोपून घरी परतत असताना हा हल्ला झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर नेहमीप्रमाणे कुद्रेमणी येथील क्लिनिकमधील काम आटोपून रात्री उशिरा तुर्केवाडी येथील घरी परतत होत्या. याच वेळी अंधाराचा फायदा घेत दोन अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे डॉक्टर घाबरल्या असल्या तरी त्यांनी धैर्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आजूबाजूला हालचाल जाणवल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  या प्रकरणाचा छडा लावणे हे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

दरम्यान, या घटनेबाबत पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तुर्केवाडी परिसरात महिलांवर अशा प्रकारचा हल्ला पहिल्यांदाच घडल्याचे सांगितले जात असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत असून रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून लवकरात लवकर आरोपींना अटक करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment