कालकुंद्री येथील मोबाईल टॉवर वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांतून संताप, सिम कार्ड पोर्ट करण्याचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2026

कालकुंद्री येथील मोबाईल टॉवर वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकांतून संताप, सिम कार्ड पोर्ट करण्याचा इशारा

वारंवार सेवा खंडित होत असलेला कालकुंद्री येथील मोबाईल टावर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

  ऐन लग्नसराई व विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात कालकुंद्री, ता. चंदगड येथील मोबाईल टॉवरची सेवा गेल्या महिनाभरापासून वारंवार खंडित होत आहे. शेकडो रुपये खर्च करून मारलेली मोबाईल रिचार्ज नेटवर्क अभावी वाया जात असल्यामुळे ग्राहक व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 कालकुंद्री हे चंदगड तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे गाव समजले जाते. चार वर्षांपूर्वी येथे एका कंपनीने टॉवर उभा करून ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीच्या काळात चांगली सेवा दिल्याने व गावात टॉवर उभा राहत असल्याने कालकुंद्री व परिसरातील सुमारे ५ हजार ग्राहकांनी या कंपनीचे नवीन सिम कार्ड खरेदी केले आहे. तर काही ग्राहकांनी इतर कंपन्यांची सिमकार्डे पोर्ट करून घेतली आहेत. परिणामी परिसरात मोबाईल ग्राहकांची संख्या प्रचंड वाढली असली तरी गेल्या एक-दोन महिन्यात नेटवर्क वारंवार खंडित होण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. एकंदरीत या टॉवर ची 'असून अडचण नसून खोळंबा' अशीच अवस्था झाली आहे. सध्या शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने ऑनलाईन अभ्यासात अडथळे निर्माण झाले आहेत, दुसरीकडे ऐन यात्रा हंगाम व लग्नसराईत करावे लागणारे फोन बंद झाल्याने लग्न व इतर कार्यक्रमांची निमंत्रणे देणेही मुश्किल झाले आहे. आधुनिक काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. फोन पे गुगल पे आदी आर्थिक व्यवहार, गॅस सिलेंडर बुकिंग, ऑनलाइन बँकिंग सेवा असे कित्येक व्यवहार व व्हाट्सअप ठप्प झाले आहेत. कंपनी अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सेवा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा सिम कार्ड अन्य कंपनीमध्ये पोर्ट करण्याची मोहीम हाती घेण्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment