स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांविरोधात तेऊरवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2026

स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलांविरोधात तेऊरवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    तेऊरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटरमुळे वाढीव व अवास्तव वीज बिले येत असल्याचा आरोप करत महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कोवाड येथील सहाय्यक अभियंत्यांसह चंदगड पोलिस ठाणे आणि तहसीलदार कार्यालयाला निवेदन सादर केले.

    निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, गावात ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण झाला असून नागरिकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

    स्मार्ट मीटर प्रणाली ग्राहकांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी सुरू करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अनेकांना आर्थिक फटका बसत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्राहकांनी वेळेवर वीज बिलांचा भरणा करणे अपेक्षित असताना प्रशासनानेही अचूक, पारदर्शक आणि न्याय्य सेवा देणे ही आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये गावातील सर्व स्मार्ट मीटरची तात्काळ तांत्रिक तपासणी करून दोषपूर्ण मीटर बदलण्यात यावेत, स्मार्ट मीटरपूर्वी आणि नंतरच्या वीज वापराचा तुलनात्मक अभ्यास करून वाढीव बिलांचे कारण लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात यावे, तसेच चुकीने आकारलेली अतिरिक्त रक्कम ग्राहकांच्या खात्यात समायोजित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मागील एक वर्षातील सर्व वीज बिलांची फेरतपासणी करून ग्राहकांवर अन्याय झाला असल्यास त्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

    ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत, पुढील दहा दिवसांत मागण्यांवर निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तेऊरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment