शाहूंच्या विचारांचा जयघोष करणारे राज्यकर्तेच त्यांच्या विचारांचे मारेकरी - प्रा. ॲड. एन. एस. पाटील, र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2026

शाहूंच्या विचारांचा जयघोष करणारे राज्यकर्तेच त्यांच्या विचारांचे मारेकरी - प्रा. ॲड. एन. एस. पाटील, र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन, वंचित आणि शोषित समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. मात्र आज त्याच समाजासाठी शिक्षणाची दारे हळूहळू बंद होताना दिसत आहेत. दुर्दैवाने, अनेक राज्यकर्ते शाहू महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय सोयीसाठी वापर करतात; प्रत्यक्षात त्यांच्या समता, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या विचारांनाच हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP) नावाखाली बहुजनांच्या शिक्षणाचे संकुचितीकरण केले जात आहे,” अशी खंत खेडूत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील यांनी व्यक्त केली.

    येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील होते, तर प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांची प्रमुख उपस्थिती होती.

        आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्रा. पाटील यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सद्य शिक्षण व्यवस्थेवर परखड भाष्य केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र आणि देशाच्या सामाजिक जडणघडणीत राजर्षी शाहू महाराज तसेच बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे योगदान दिशादर्शक आहे. शाहू महाराजांनी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा करून उपेक्षितांच्या हाती ज्ञानाचे शस्त्र दिले. परंतु आज शिक्षणातील वाढते व्यापारीकरण आणि असमानता पाहता आपण शाहूंच्या विचारांपासून दूर जात आहोत का, असा प्रश्न निर्माण होतो. शाहूंच्या विचारांचा सन्मान केवळ जयंती साजरी करून नव्हे, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणूनच करता येईल.”

        प्रास्ताविकात प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “शिक्षण, सामाजिक न्याय आणि लोककल्याण यांचा आदर्श आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे. शिक्षणाच्या माध्यमातून दुर्बल घटकांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने क्रांतीसूर्य होते.”

        यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एम. एम. माने यांनीही मनोगत व्यक्त करत शाहू महाराजांचे कार्य सामाजिक समतेच्या चळवळीचे ऊर्जाकेंद्र असल्याचे नमूद केले.

        अध्यक्षीय भाषणात प्रा. आर. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले, “शाहू महाराजांनी दिलेला शिक्षण, समता आणि मानवतेचा वारसा केवळ जपण्याची नव्हे, तर तो पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन न करता शाहूंच्या विचारांचा सखोल अभ्यास करून समाजभान असलेले सजग नागरिक बनावे.”

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक तथा इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. आयक्यूएसी समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आर. के. तेलगोटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

No comments:

Post a Comment