सीमाकवी रवींद्र पाटील यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2026

सीमाकवी रवींद्र पाटील यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे’ मध्ये शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सीमाकवी रवींद्र मारुती पाटील (बेळगाव) यांना प्रतिष्ठेचा ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक येथे पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकर अंदानी (अहिल्यानगर) होते. पद्मश्री उदय देशपांडे आणि माजी सभापती अक्काताई नलवडे यांच्या हस्ते रवींद्र पाटील यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, या साहित्य संवाद परिषदेचे उद्घाटक म्हणूनही त्यांनी उपस्थिती लावली.

सीमाकवी, पत्रकार, तंत्रस्नेही शिक्षक, गीतकार, समालोचक, निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असलेले रवींद्र पाटील हे बेळगाव सीमाभागातील कुद्रेमानी गावचे सुपुत्र असून, सध्या राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि सीमाप्रश्नांवरील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लेखणीतून सीमावासियांच्या व्यथा मांडणारे ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ हे प्रभावी गीत साकार झाले असून, ‘सीमालढा’ हा त्यांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटकचे राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी बेळगाव येथे सलग सात वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच बडोदा, दिल्ली आणि विविध अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये कवी म्हणून सहभाग नोंदवून सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे.

शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत १० हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या नव्या सन्मानाबद्दल सीमाभागातील शिक्षक, साहित्यिक, पत्रकार तसेच विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment