चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दुर्बल, निराधार, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि गरजू नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा केवळ ₹२१ हजार असल्याने अनेक पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. ही मर्यादा वाढवून ती थेट ₹१ लाख करण्यात यावी, अशी मागणी चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांनी स्थानिक आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात श्री. गावडे यांनी नमूद केले आहे की, सध्याच्या नियमांनुसार लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२१ हजारांपेक्षा कमी असणे किंवा त्यांचे नाव बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) यादीत असणे आवश्यक आहे. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात ही उत्पन्न मर्यादा अत्यंत अपुरी ठरत असून, प्रत्यक्षात गरजू असलेल्या अनेक कुटुंबांना आवश्यक उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.
त्यांनी शासनाकडे उत्पन्न मर्यादा ₹१ लाख करण्याची शिफारस करण्याची विनंती आमदार शिवाजीराव पाटील यांना केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास चंदगड तालुक्यासह राज्यातील हजारो निराधार, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांना शासकीय पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, श्री. लक्ष्मण गावडे यांनी मांडलेल्या या जनहिताच्या मागणीचे चंदगड तालुक्यात स्वागत होत असून, या विषयावर आमदार शिवाजीराव पाटील शासनस्तरावर कोणता पाठपुरावा करतात, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

No comments:
Post a Comment