![]() |
| सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी हेरे सरंजाम प्रश्न मार्गी लावून मोठे कार्य केले आहे. याचा फायदा परिसरातील संबंधित शेतकऱ्यांना होत असून त्याचे ७/१२ उतारे शासनामार्फत वितरित केले जात आहेत. ही चांगली बाब आहे. तथापि हेरे (ता. चंदगड) गावठाणमधील २९० गोरगरीब गरजू लोकांना ३५ वर्षांपूर्वी देण्यात आलेले प्लॉट लाभार्थीच्या नावावर न झाल्यामुळे गोरगरीब प्लॉटधारक लाभापासून वंचित राहिले आहेत. हा प्रश्न कधी मार्गी लागणार? असा सवाल प्लॉट धारकांनी केला असून याबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांनी पुढाकार घेऊन प्लॉट धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्लॉट धारकांपैकी एक लाभार्थी व किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार उर्फ शेलारमामा यांनी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी चंदगड तहसील कार्यालयासमोर प्लॉटधारकांसह आमरण उपोषण केले होते तथापि तोंडी आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. १९८९ मध्ये हेरे येथील तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने गोरगरीब गरजू कुटुंबांना गावठाण हद्दीतील प्रत्येकी दीड गुंठ्याचे प्लॉट दिले होते. तथापि, शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे हे प्लॉट अद्याप लाभार्थींच्या नावावर झालेले नाहीत. ३६ वर्षे झाली तरी प्लॉट जमीन नावावर नसल्यामुळे शासनामार्फत प्लॉटवर बांधण्यासाठी मंजुरी मिळालेली घरकुले रद्द झाली. घरकुल बांधण्यासाठी आलेला निधीही परत गेलेला आहे.
गावठाण वाढ योजना अंतर्गत हेरे प्रशासनाचे आदेश क्र. ७०४०/९० दि. २२/११/१९९० प्लॉटची किंमत २२५/- रु. तहसिलदार यांच्या आदेशानुसार ट्रेझरीत जमा केली असूनही आजमिती पर्यंत प्रशासनाने डोळे झाकपणाची भूमिका का घेतली? असा प्लॉट धारकांचा सवाल आहे. याबाबतीत काही राजकारण सुरू आहे; की प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्लॉट वितरण रखडले आहे? याची चौकशी व्हावी अशी मागणी २९० प्लॉट धारकांतून होत आहे. यातील बरेच प्लॉट धारक मयत झाले असून त्यांचे वारस प्लॉट वितरण कधी होणार याकडे डोळे लाऊन बसले आहेत. आमदार शिवाजीराव पाटील यांनी याबाबत लक्ष घालून प्लॉट धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत असून या प्रश्नाची प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा प्लॉट धारकांना जलसमाधी आंदोलन करावे लागेल असा इशारा रघुवीर शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:
Post a Comment