रक्षाबंधनाच्या निमित्ताने एस.एस. हायस्कूल, नेसरी येथे ‘वृक्ष बंधन’ उपक्रम उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2026

रक्षाबंधनाच्या निमित्ताने एस.एस. हायस्कूल, नेसरी येथे ‘वृक्ष बंधन’ उपक्रम उत्साहात

नेसरी / सी एल वृत्तसेवा

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण असला, तरी निसर्गाशी असलेले आपले ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा संदेश देत एस.एस. हायस्कूल, नेसरी (ता - गडहिंग्लज )  येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनोख्या ‘वृक्ष बंधन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या परिसरातील फणसाच्या वृक्षाला प्रशालेचे मुख्याध्यापक  एस. एच. पाटील  उपमुख्याध्यापक एम. ए. कांबळे यांच्या हस्ते प्रेमाची आणि संरक्षणाची प्रतीक असलेली राखी बांधण्यात आली. या अभिनव उपक्रमातून ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ तसेच ‘वृक्ष म्हणजेच जीवन’ हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना फणस वृक्षाचे पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. फणसाचे झाड आपल्याला फळ, सावली, लाकूड यांसह जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान देते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. झाडे केवळ आपल्याला प्राणवायू देत नाहीत, तर हवा शुद्ध ठेवणे, तापमान नियंत्रित करणे, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि असंख्य सजीवांना आश्रय देणे अशा अनेक प्रकारे मानवी जीवन समृद्ध करतात, याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

आजच्या बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत वृक्षसंवर्धन ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढीच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, संवेदनशीलता आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

याप्रसंगी पर्यवेक्षक  एस.ई.सुतार , उपक्रमाचे नियोजन करणारे  संतोष देसाई  व इयत्ता सातवी चे विद्यार्थी,शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment